Join us

चार वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ आयपीएस बदल्यांच्या रॅकेटचा होणार फेरतपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:05 AM

गृह विभागाकडून गतीने हालचाली; वादग्रस्त अधिकाऱ्याची चौकशी झाली नसल्याचा संशयजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी पोलीस ...

गृह विभागाकडून गतीने हालचाली; वादग्रस्त अधिकाऱ्याची चौकशी झाली नसल्याचा संशय

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी सुरू असताना राज्य सरकार आता चार वर्षांपूर्वीच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटची पुन्हा नव्याने चौकशी करणार आहे.

तत्कालीन सरकारच्या दबावामुळे अनेक वादग्रस्त वरिष्ठ आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांकडे चौकशी झाली नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडे चौकशी केली जाईल. न्यायालयात दाखल खटल्याचा पुन्हा तपास करण्याबाबत गृह विभागाकडून गतीने हालचाली करण्यात येत असल्याचे अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयपीएस अधिकारी नामदेव चव्हाण यांनी २०१७ मध्ये याबाबत तक्रार दिली होती. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणी तपासाअंती पाच जणांना अटक केली होती. मात्र, तत्कालीन राज्यकर्त्यांच्या मर्जीतील मंडळी व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर येऊनही त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती, असा दावा या अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याच्या परमबीर सिंग यांच्या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात बदलीसाठी लाखोंची मागणी केल्याबद्दल एका अधिकाऱ्याने तक्रार दिली होती. आता त्या रॅकेटमधील काही आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरविल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात एक आयपीएस स्वतः तक्रारदार असून त्याने बदलीच्या रॅकेटबद्दल अनेक गंभीर पुरावे तपास अधिकाऱ्यांना दिले होते, मात्र केवळ खासगी व्यक्तींना अटक करून मुख्य म्होरक्यांना वाचविण्यात आले होते, असे समाेर आले आहे.

* काय होते बदली रॅकेट?

त्या वेळी सोलापुरात उपायुक्त असलेल्या चव्हाण यांना मुंबईत चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देण्यासाठी मे २०१७ मध्ये लाखो रुपयांची मागणी केली होती. त्यांनी मुंबई क्राइम बँचकडे तक्रार दिल्यानंतर १ जूनला अंधेरीतील सहारा हॉटेलमध्ये छापा मारून मिटिंगसाठी आलेल्या किशोर माळी, रवींद्र यादव, विशाल ओंबळे व विद्यासागर हिरमुखे यांना अटक केली. त्यानंतर त्यांचा फरार साथीदार कमलेश कानडेला पुण्यातून पकडले. त्याच्याकडे सापडलेल्या यादीत या रॅकेटमध्ये सहभागी आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची नावे समाेर आली. मात्र त्यांची चाैकशी दबावाखाली झाली. त्यामुळे केवळ एका अधिकाऱ्याचा जबाब नोंदवून सोडून देण्यात आले. पाच खासगी मध्यस्थांवर आरोप निश्चत करून खटला दाखल करण्यात आला.

...........................