खुर्चीसाठी हाणामारी, राष्ट्रवादीच्या बैठकीत राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:49 AM2018-10-22T05:49:08+5:302018-10-22T05:49:23+5:30
मुंबईत आधीच तोळामासा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत पोहोचली आहे.
मुंबई : मुंबईत आधीच तोळामासा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत पोहोचली आहे. पक्षाच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत बसण्याच्या जागेवरून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भिडले. एकमेकांवर खुर्च्या फेकत, लाठीकाठ्या चालवत पदाधिकाºयांनीच गोंधळ घातला. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी बोलावलेली बैठक उधळली गेली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी चांदिवली येथे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाºयांची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष अमित तिवारी यांची बसण्याच्या जागेवरून अन्य पदाधिकाºयांसोबत बाचाबाची झाली. स्थानिक बैठक असल्याचे सांगत तिवारी यांना बैठकीतून हुसकावण्यात आले. या घटनेनंतर तिवारी आपल्या समर्थकांसह पुन्हा बैठकीच्या ठिकाणी आले आणि त्यांनी हाणामारीला सुरुवात केली. एकमेकांवर खुर्च्या फेकत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. या तुफान हाणीमारीत काही कार्यकर्ते जखमी झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाºयांनी साकीनाका पोलिसांत तक्रार दिली. तिवारी यांनी समर्थकांसह हाणामारी करताना जातिवाचक शिवीगाळ केल्याचीही तक्रार कैलास आगवणे या कार्यकर्त्याने केली असून अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंद झाला.
>योग्य ती कारवाई करणार
बैठकीत झालेल्या या घटनेची दखल घेण्यात येईल. प्रांताध्यक्ष जयंत पाटील आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासमोर सर्व बाबी मांडून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.