मुंबई : जळगावमधील भाजपच्या सभेतील राडा चर्चेत असताना मानखुर्दमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये मानपानावरून वाद झाला. यामध्ये तालुका अध्यक्षाला मारहाण झाली. मात्र यात धक्काबुक्की झाल्याचे सांगून कुठल्याही स्वरूपाची तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली.मानखुर्दच्या मोहिते पाटीलनगर परिसरात भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. याच दरम्यान स्थानिक नेत्याचे नाव घेतले नाही म्हणून कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याच रागात राजेंद्र पाटोळे यांनी मानखुर्द तालुकाध्यक्ष हेमंत भास्कर यांना मारहाण सुरू केली. यामध्ये त्यांना मारहाण झाल्याची माहिती त्यांच्याच पदाधिकाºयाकडून समजली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वरिष्ठांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत केले. यामध्ये हेमंत भास्कर हे जखमी झाले आहेत.या प्रकरणी अद्याप कुणाविरुद्ध तक्रार देण्यात आलेली नाही. याबाबत भाजप उमेदवाराचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्याकडे विचारणा करताच, त्यांनी केवळ वैयक्तिक वादातून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगत मारहाण झाल्याचे त्यांनी नाकारले.>स्थानिक नेत्यांचे नाव घेतले नाही म्हणून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि धक्काबुक्की झाली. या प्रकरणी कुठल्याही स्वरूपाची तक्रार देण्यात आलेली नाही.- नितीन बोबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानखुर्द पोलीस ठाणे
भाजप कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान राडा, मानपानावरून तालुका अध्यक्षाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 6:18 AM