Join us

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार शहर महापालिका प्रशासन आयोजित परिवहन बसेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले राज्याचे नगरविकासमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : वसई-विरार शहर महापालिका प्रशासन आयोजित परिवहन बसेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदें यांच्या कार्यक्रमात ‘पालिका आयुक्त आम्हाला वेळ द्या’ असे जोरजोरात ओरडत वसईतील मनसैनिकांनी घोषणाबाजी करीत राडा केला. यावेळी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वसई-विरार महापालिका प्रशासनाने मंगळवारी दुपारी परिवहन बसेसचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेतेमंडळी हजर असताना, अचानकपणे मनसैनिक आक्रमक झाले. त्यातील मनसेच्या दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा केला.

पोलीस आणि शिवसैनिकांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना यावेळी बेदम चोप देत, कार्यक्रमातून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत, पोलीस ठाण्यात नेले.

दरम्यान, परिवहन सेवेवरून बविआ-शिवसेना आमने-सामने उभी असताना, मध्येच मनसेने राडा करत कार्यक्रमाला गालबोट लावले, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांमध्ये यावेळी उमटली. वसई-विरार परिवहन सेवा सुरू करण्यावरून बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचे राजकारण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात परिवहन सेवा पूर्णपणे बंद झाली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच महापालिका हद्दीत बविआने उद्घाटन करून बससेवा सुरू केली होती.

आता हीच परिवहन सेवा आम्ही सुरू केली असल्याचा दावा करत, या परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा वसई-विरार महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी आ. रवींद्र फाटक, पालिका आयुक्त गंगाथरन डी. आणि पालिका अधिकारी व वसईतील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.