लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जुहू येथील रडार पुन्हा कार्यान्वित केले आहे. शिवाय अंधेरी आणि दहिसर परिसरातील रडार अपग्रेड करण्याचे नियोजन असल्यामुळे या परिसरात नव्या इमारतींची उंची घटणार आहे. २०१४ साली रडारच्या कार्यक्षेत्रातील इमारतींची उंची ५७ मीटर इतकी होती. त्यामुळे १४ ते १५ मजल्यांच्या इमारतींचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाने इमारतींची उंची ४० मीटर इतकी मर्यादित केल्याने केवळ ९ ते १० मजल्यांच्या इमारती उभारता येणार आहेत.
रडारच्या कार्यक्षेत्रात इमारतीच्या बांधकामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. त्यांनी निर्देशित केलेल्या उंचीपेक्षा अधिक उंचीचे बांधकाम करता येत नाही. मात्र, विलेपार्ले परिसरात एका हॉटेलला मर्यादेपेक्षा अधिक उंचीचे बांधकाम करण्यास परवानगी दिल्यामुळे त्या नियमाचा आधार घेत बऱ्याच विकासकांनी विमानतळ प्राधिकरणाकडे धाव घेतली.
शिडिंग बेनिफिट नियमानुसार आपणासही अधिक उंचीचे बांधकाम करण्यास मज्जाव करू नये, अशी मागणी विकासकांकडून करण्यात आली. अशा प्रकारच्या मागण्यांवर अंकुश आणण्यासाठी जुहू परिसरातील बंद असलेला रडार पुन्हा कार्यान्वित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यापुढील कोणत्याही बांधकामास शिडिंग बेनिफिट दिले जाणार नसल्याची भूमिका विमानतळ प्राधिकरणाने दिल्यामुळे निर्माणाधीन आणि पुनर्विकास प्रलंबित असलेल्या इमारतींची उंची घटणार आहे.
...
चौकट
रडारचा उपयोग काय?
विमानांच्या सुरळीत वाहतुकीसाठी रेडिओ डिटेक्शन आणि रेंजिंग (रडार) यंत्रणेचा वापर केला जातो. धावपट्टीवरील टचडाउन पॉइन्टपासून विमान किती अंतरावर आहे, त्याची उंची किती आहे, आजूबाजूला आणखी विमाने आहेत का, लॅण्डिंग कोणत्या दिशेने करायचे आहे, हे समजण्यासाठी रडारचा उपयोग होतो. रडारच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी आसपासच्या इमारतींची उंची मर्यादित असावी लागते, अशी माहिती हवाई वाहतूक तज्ज्ञ नितीन जाधव यांनी दिली.