राज्यातील बोगस फिजिओथेरपिस्ट परिषदेच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:05 AM2021-07-25T04:05:27+5:302021-07-25T04:05:27+5:30
मुंबई : राज्यात विनापरवानगी कार्यरत असणारे बोगस फिजिओथेरपी डॉक्टर महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषदेच्या रडारवर आहेत. परिषदेकडून तीन ...
मुंबई : राज्यात विनापरवानगी कार्यरत असणारे बोगस फिजिओथेरपी डॉक्टर महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषदेच्या रडारवर आहेत. परिषदेकडून तीन टप्प्यांत कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात पदवी व नोंदणी न करता उपचार करणारे बोगस डॉक्टर आणि संस्था अशा तब्बल ३२ जणांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुदीप काळे यांनी दिली आहे
परिषदेने पहिल्या टप्प्यात राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, सातारा, बुलडाणा आणि जळगाव या जिल्ह्यांत छापे टाकून तब्बल १४ बेकायदेशीर शैक्षणिक संस्था आणि कार्यरत असलेल्या १८ बोगस डॉक्टरांविरोधात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परिषदेची मान्यता न घेता फिजिओथेरपी अभ्यासक्रम बेकायदेशीररीत्या चालवणाऱ्या संस्था मागील काही काळात वाढल्या आहेत. तर दुसरीकडे फिजिओथेरपीची नोंदणी न करता बोगस पदवी घेऊन उपचार करणारे डॉक्टरही वाढत आहेत. त्यामुळे परिषदेकडून याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.
याविषयी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुदीप काळे यांनी सांगितले, फिजिओथेरपीचे उपचार घेताना रुग्ण व नातेवाइकांनी डॉक्टरची पदवी किंवा परिषदेकडे केलेली नोंदणी सदस्यत्व हे तपासूनच उपचार घ्यावेत त्याचप्रमाणे याविषयीचे शिक्षण घेतानाही त्या संस्थेने सरकारची मान्यता घेतली आहे की नाही याची खातरजमा करावी, असे आवाहन केले आहे.