कोटकांच्या मिरवणुकीतील ड्रोन पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:15 AM2019-04-13T06:15:22+5:302019-04-13T06:16:19+5:30
पोलिसांकडून निवडणूक आयोगाला पत्र : अधिक चौकशी सुरू
मुंबई : ड्रोनला बंदी असतानाही मिरवणुकीत ड्रोन उडविल्यामुळे भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनीच याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
सोमवारी कोटक यांनी अर्ज भरण्यापूर्वी केलेल्या शक्तिप्रदर्शनात ड्रोनचा वापर केला. सुरुवातीला पोलिसांनी त्याकडे पाहूनही दुर्लक्ष केले. याच ड्रोनद्वारे मुलुंड पश्चिमेपासून ते निवडणूक कार्यालयापर्यंत चित्रण करण्यात आले होते. त्यानंतर या ड्रोनच्या चर्चा रंगल्या आणि अखेर पोलिसांना त्याविरुद्ध भूमिका घेणे भाग पडले. पोलिसांनी भाजप उमेदवाराच्या मिरवणुकीत ड्रोनचा वापर केल्याप्रकरणी उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांना पत्र दिले आहे.
गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर पोलिसांकडूनच योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तर साहाय्यक पोलीस आयुक्त पांडुरंग शिंदे यांनी, या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, त्यानुसार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
नियमांचे उल्लंघन नाही
५० फुटांखालील क्षेत्रात ड्रोन उडविण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. केवळ शोभायात्रेचे छायाचित्रण करण्यासाठी ड्रोनचा वापर झाला. तो १५ ते १६ फुटांच्या वर उडविण्यात आलेला नाही. शिवाय कुठल्याही प्रतिबंधित क्षेत्रात वापर केलेला नाही. अडीच तास शोभायात्रा सुरू होती. त्यादरम्यान सुरुवातीला पोलिसांनी हटकले तेव्हा, संबंधित छायाचित्रकाराने ड्रोनसंबंधित प्रमाणपत्रे तसेच नियमावलीबाबत सांगितले. त्यांनाही ते पटल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला नाही. याबाबत आचारसंहिता कक्षाच्या अधिकाऱ्यांनाही विचारणा केली होती. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन केलेले नाही. पोलीस बचावात्मक भूमिका घेत, चौकशी करत असल्याचे सांगत असावे.
- भालचंद्र शिरसाट, प्रवक्ते, मुंबई भाजप उपाध्यक्ष