ड्रग्जचा पुरवठा करणारेच रडारवर; वर्षभरात ४२३ किलो ड्रग्ज जप्त, मिश्रित ड्रग्जची बाजारात चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 04:11 AM2017-12-24T04:11:24+5:302017-12-24T04:11:45+5:30

‘दम मारो दम.. मिट जाये गम, अक्कड बक्कड बम्बे बो.. अस्सी नब्बे पुरे सौ. सौ रुपये का दम जो लू.. दोसो गम को उड्डण छू..’ याच गाण्याच्या तालावर आणि ओळीतील अर्थाप्रमाणे मुंबईची तरुणाई नशेच्या धुंदीत अडकताना दिसते आहे.

Radar overdrive; Over 423 kg of drugs seized in the year, moving in the market of mixed drugs | ड्रग्जचा पुरवठा करणारेच रडारवर; वर्षभरात ४२३ किलो ड्रग्ज जप्त, मिश्रित ड्रग्जची बाजारात चलती

ड्रग्जचा पुरवठा करणारेच रडारवर; वर्षभरात ४२३ किलो ड्रग्ज जप्त, मिश्रित ड्रग्जची बाजारात चलती

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : ‘दम मारो दम.. मिट जाये गम, अक्कड बक्कड बम्बे बो.. अस्सी नब्बे पुरे सौ. सौ रुपये का दम जो लू.. दोसो गम को उड्डण छू..’ याच गाण्याच्या तालावर आणि ओळीतील अर्थाप्रमाणे मुंबईची तरुणाई नशेच्या धुंदीत अडकताना दिसते आहे. अशात मुंबई अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) पुरवठा करणाºयांना टार्गेट केले. वर्षभरात पथकाकडून तब्बल दोन ते तीन फॅक्टºया उद्ध्वस्त करत साडे बारा कोटी किमतीचे ४२३ किलो ९६६ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले. आता थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षानिमित्ताने ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ असे म्हणणाºयांना एएनसीकडून ‘ये तो बस शुरुवात है’ असा इशारा देण्यात येत आहे. त्यात मुंबईत अमलीपदार्थांचा पुरवठा करणाºयांचे धाबे दणाणल्याने मुंबईत ८० टक्के मिश्रित ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचेही त्यांच्या कारवाईतून समोर आले.
अमलीपदार्थांच्या तस्करी आणि विक्रीसाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईला टार्गेट केले जाते. बदलती जीवनशैली, नैराश्य, हरवत चाललेला संवाद, एकटेपणातून स्वत:बाबतचा चुकीचा समज यातून मोठ्या प्रमाणात तरुणाई नशेचा आधार घेत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ तसेच विविध सर्वेक्षणांतून उघड होते. परदेशातून मोठ्या प्रमाणात या ड्रग्जचा पुरवठा मुंबईत केला जातो. अशात ड्रग्जचा हब बनत चाललेल्या १८.४१ दक्षलक्ष मुंबईकरांसाठी एएनसीमध्ये एक पोलीस उपायुक्त, २६ अधिकारी आणि १२९ कर्मचारी काम करताना दिसत आहेत. जानेवारीमध्ये शिवदीप लांडे यांनी एएनसीच्या उपायुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यापासून यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून आला. लांडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी यापूर्वीच्या कारवाईचा आढावा घेतला. सुरुवातीला पुरवठा आणि मागणी या दिशेने माहिती काढली. मागणी थांबविण्यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे. मात्र अजूनही हवा तसा पुढाकार पाहावयास मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी पुरवठा करणाºयांनाच टार्गेट केले. पुणे, करमाळी या भागांतील कारखाने उद्ध्वस्त केले. तसेच पार्टी ड्रग्ज पुरविणाºया बकुल चंदरीयालाही बेड्या ठोकल्या आहेत.
‘ही कारवाई सुरू असताना आम्ही ड्रग्ज फ्री कॅम्पस ही मोहीम राबविली. आतापर्यंत जवळपास ५०हून अधिक महाविद्यालयांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. चांगली बाब म्हणजे याच शाळा, कॉलेजातील विद्यार्थी आम्हाला माहिती देण्यासाठी पुढे येत असल्याचे लांडे यांनी सांगितले. मुंबईत एएनसी स्थापन झाल्यापासून या वर्षी मुंबईतून केलेली कारवाई ही सर्वाधिक असल्याचे एएनसीच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. या वर्षी मुंबईतून १२ कोटी ५३ लाख २२ हजार ३०० किमतीचे ४२३ किलो ९६६ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले आहेत. मुंबईत दाखल झालेल्या ६७ गुन्ह्यांमध्ये १३५ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. यामध्ये एमडी ३३ किलो, हेरॉईन २ किलो, चरस ५३ किलो, गांजा ३२३ किलो तर १ हजार ५२५ एलएसडी डॉट्सचाही समावेश आहे. गेल्या वर्षी १ कोटी ८६ लाख २९ हजार १४१ किमतीचे २६८ किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. यामध्ये एमडी ३ किलो, हेरॉईन १ किलो, चरस ६ किलो तर गांजा २३८ किलो होता. या कारवाईदरम्यान मुंबईत ८० टक्के मिश्रित ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. एमडीमध्ये तुरटी, अजीनोमोटो, केमिकल्सचा वापर करण्यात येतो. मात्र नशेच्या धुंदीत मुलांना याचे भान नसते. मुंबईत सध्यातरी कारवाईमुळे थेट ड्रग्जचा पुरवठा होत नाही. पण मुंबईत ड्रग्जचे सेवन करणाºयांना ठाणे, मुंब्रा या भागातून ड्रग्ज मिळत असल्याची माहिती एएनसीने दिली. अशात थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षानिमित्तही कुठे पार्टीमध्ये ड्रग्जचा सप्लाय होतोय का? त्या दिशेने तपास सुरू असल्याचे लांडे यांनी सांगितले. अशात सोशल मीडियावर त्यांचे विशेष लक्ष आहे.

खत प्लांट बाजारात : खत हे आफ्रिकेतील हॉर्न व अरबी बेटावरील मूळ वृक्ष आहेत. खतामध्ये एल्कालोइड कॅथिनोन असतो; तसेच त्यामधील अ‍ॅम्फेटामाइन या उत्तेजक द्रव्यामुळे भूक न लागणे, अधिक उत्साह निर्माण होणे असे होत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे याचाही वापर होत असल्याचे मुंबई एएनसीच्या कारवाईतून दिसले. या कारवाईतून १० किलो खत प्लांट जप्त केले. त्याची किंमत १० लाख ७० हजार २०० इतकी आहे.

यांच्याकडून आणखी प्रयत्न होणे गरजेचे
ड्रग्ज बनविणाºया कारखान्यांवर थेट कारवाई करण्याचे विशेष अधिकार अमलीपदार्थ नियंत्रण प्रशासन (एनसीबी), महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), सेंट्रल ब्युरो आॅफ नार्कोटीक्स (सी.बी.एन.), कस्टम अ‍ॅण्ड सेंट्रल एक्साईज (सीसीई) यांच्याकडे आहेत. तसे अधिकारी एएनसीकडे नाहीत. त्यामुळे संबंधित तपास यंत्रणांनी ड्रग्ज कारवाईकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याचा सूरही एएनसीकडून कानी पडला.

येथे करा तक्रार : बदनामीच्या भीतीने कोणीही माहिती देण्यास पुढे येत नाही. अशात पालकांसाठी, मुलांसाठी मुंबई एएनसीने नार्को इन्फोलाइन क्रमांक ९८१९१११२२२ सुरू करण्यात आला आहे. जेणेकरून किमान फोनवरून तरी माहिती देण्यास नागरिकांनी पुढे यावे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. ज्या तक्रारी येतात त्यानुसार त्यावर कारवाई केली जाते, असे शिवदीप लांडे यांनी सांगितले.


आई-वडिलांनी नोकरी करणे गरजेचे आहे, पण तरुणांकडे लक्ष देणे तर त्याहून गरजेचे आहे. तरुणांचे रात्री-अपरात्री घरी येणे, संगणकासमोर तासन् तास वेळ खर्च करणे या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर घडत असतानाही पालक मुलांच्या वर्तणुकीकडे कानाडोळा करतात. उलट आपण वेळ देत नाही तर पैशातून मुलांचे मन रमेल, असा विचार पालकांच्या सुपीक डोक्यातून येतो. आपली मुले वयात येतात तेव्हा त्याची पहिली जाणीव पालकांना होते, मग शेजाºयांना. त्यांच्या वागणुकीतील आणि वर्तनातील बदल जबाबदार पालकच ओळखू शकतात. पौगंडावस्थेमध्ये जिज्ञासा, नव्या गोष्टी करून पाहण्याची जिद्द असतेच. शरीरातील होणाºया बदलांमुळे ती भावना निर्माण होते. मात्र शरीर आणि मनात निर्माण होणारी ऊर्जा वापरण्याचा मार्ग कोणता निवडावा, हे कळत नसल्याने उच्चभ्रू वस्तीतील मुले अशा व्यसनांच्या विळख्यात अडकतात. अशात परीक्षेत कमी मिळालेले मार्क, प्रेमभंग, वैयक्तिक आयुष्यातील आलेल्या समस्या फार मोठ्या वाटतात आणि तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाते. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना समजून घ्या. पाल्याच्या हालचालींत बदल जाणवल्यास समुपदेशकांची मदत घ्या.
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ


आजही लोखंडवालासारख्या परिसरात ३००मधील १५ मुलांची परिस्थिती याच व्यसनामुळे चिंताजनक झाली आहे. अशा अनेक उच्चभ्रू वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात मुले ड्रग्जच्या आहारी जाताना दिसत आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे या सोसायटीतील आई-वडिलांना ते मान्य नाही.‘माझा मुलगा ते करूच शकत नाही,’ अशी त्यांची भूमिका असते आणि त्यावर ते ठाम असतात. अनेक घरांमध्ये पालकच व्यसन करीत असल्याने याच स्टेट्स सिम्बॉलचे मुलेही अनुकरण करायला लागलात. माझा मुलगा सगळ्यांच गोष्टींत अ‍ॅडव्हान्स आहे आणि का नसावा? असेही पालकांचे मत असते. खरेतर हे अस्वस्थ करणारे आहे. मुळात एका क्लिकवर या मुलांना सर्वकाही उपलब्ध होत आहे. घरातील खुल्या वातावरणात ते हरवत आहेत याची जाणीव पालकांना नाही. त्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या तरुणांना नवनवीन टेस्ट करायला आवडते. आज मैने ये टेस्ट किया, आज मैने ओ टेस्ट किया... अशा चर्चा त्यांच्यात रंगतात; आणि कुठेतरी सिगारेट, दारूपासून सुरूझालेले व्यसन एमडी, कोकेन, हेरॉईनपर्यंत पोहोचते. आतातर मुले नवनवीन केमिकल्सचा आधार घेत आहेत. प्रत्येकाचे त्यानुसार दुष्परिणामही होत आहेत. त्यांना फक्त नशेच्या धुंदीत तरंगायचे असते. त्यामुळे पालकांमध्येच जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठीही आमची धडपड सुरू असते. मात्र यासाठी पालकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.
- वर्षा विद्या विलास,
सरचिटणीस, नशामुक्ती महामंडळ, महाराष्ट्र राज्य

Web Title: Radar overdrive; Over 423 kg of drugs seized in the year, moving in the market of mixed drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.