मुंबई विमानतळाबाहेर शिवसैनिकांचा राडा, ‘अदानी एअरपोर्ट’ नामफलकाची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 07:37 AM2021-08-03T07:37:43+5:302021-08-03T07:38:58+5:30
Mumbai News: मुंबई विमानतळाबाहेर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट’ नामफलकाला जोरदार विरोध करीत शिवसैनिकांनी सोमवारी त्याची तोडफोड केली.
मुंबई : मुंबई विमानतळाबाहेर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट’ नामफलकाला जोरदार विरोध करीत शिवसैनिकांनी सोमवारी त्याची तोडफोड केली. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असून, ते बदलण्याचा कोणी प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही भारतीय कामगार सेनेतर्फे देण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय कामगार सेनेचे सचिव संजय कदम यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावापुढे ‘ऑपरेटेड बाय अदानी’ असे लिहिल्यास आमचा आक्षेप नाही.
यावर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड स्पष्टीकरण दिले की,
आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा टर्मिनलच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल केला नाही. प्राधिकरणाचे निकष व मार्गदर्शक तत्त्वांनुसारच बदल केले आहेत. शिवसेनेचे आमदार अरविंद सावंत म्हणाले की, छत्रपतींचे नाव झाकून अदानीचा फलक लावला. हा महाराजांसह महाराष्ट्राचा अपमान आहे. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, या विमानतळाची ख्याती जगभर आहे. आधी जीव्हीकेसारख्या कंपन्यांनी असे कृत्य केले नाही. अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का?