राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माण कार्यासाठीच्या जमीन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून बुधवारी शिवसेना भवन परिसरात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी आंदोलक भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. यावेळी उपस्थित छायाचित्रकारांवरही हल्ला झाला.
राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनीही व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. शिवसेनेच्या या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चाचे आयोजन केले. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या, आस्थेवरही आघात करत असल्याचे आरोप भाजपने केले. शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, सुरक्षेच्या कारणासाठी पोलिसांनी शिवसेना भवनापासून साधारण अर्धा किलोमीटरवरच या आंदोलकांना अडवले. त्यानंतर युवा मोर्चाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेले.
भाजपच्या आंदोलनाची कुणकूण लागल्याने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सेना भवन परिसरात गर्दी केली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरण काहीसे निवळले होते. मात्र, काही वेळातच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत शिवसैनिकांची बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. महिला कार्यकर्त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण झाल्याने वातावरण तापले. यावेळी हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यातच गर्दी वाढून पुन्हा भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले.
ही तर गुंडा सेना
भाजपच्या माहिम विधानसभेच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांच्यासह विलास आंबेकर, सनी साठे, ऋषी शेळमकर यांना मारहाण झाली. शिवसेनेच्या राकेश देशमुख, चंदू झगडे, संदीप देवळेकर या स्थानिक कार्यकर्त्यांसह मिलिंद वैद्य, राजू पाटणकर, श्रद्धा जाधव यांच्यावर कारवाईची मागणी तेंडुलकर यांनी केली आहे.
एका महिलेवर हात उचलला, ही शिवसेना नव्हे, ही तर गुंडा सेना आहे. आमच्या युवा मोर्चाच्या लोकांनी आंदोलन केले. आम्ही गाडीने जात होतो तेवढ्यात शिवसेनेचे लोक आम्हाला मारायला लागले. आम्ही दादरकर आहोत. दादर यांच्या बापाचे आहे का, शिवसेना आता खिल्जीसेना बनली आहे. यांना हिंदुत्वाचं काही पडले नाही, असा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केला.