मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून, काँग्रेसमधून भाजपामध्ये डेरेदाखल झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांकडे गृहनिर्माण खातं सोपवलं आहे. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण थेट भाजपामध्ये कॅबिनेटमध्ये मंत्री झाल्यानं राजकीय वर्तुळातही अनेकांच्या भुवया उंचावल्या. विरोधी पक्षनेतेपदावरून थेट मंत्री झाल्यानं राधाकृष्ण विखे-पाटलांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही, अशीच चर्चा आहे.सोशल मीडियासुद्धा आजकाल राजकीय नेत्यांसाठी भूमिका व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम ठरत आहे. याच सोशल मीडियावरच्या फेसबुक अकाऊंटवर राधाकृष्ण विखे-पाटलांचं पद अजूनही विधानसभेचे विरोधी पक्षनेते असंच देण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपामध्ये प्रवेश न करता थेट मंत्रिपद मिळवलेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांच्या फेसबुक प्रोफालइवरही अद्यापही विधानसभेचे विरोधी पक्षनेते, असं पद दिलेलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशातच विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी फारकत घेत भाजपाशी जवळीक साधली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये नाराज झाले होते. डॉ. सुजय विखेंना तिकीट मिळावं यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील प्रयत्न करत होते, मात्र तिकीट न मिळाल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पदरात पाडली आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखेंच्या गळ्यात विजयाची माळ पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. विखे-पाटील यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला नसला तरी मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली असून, त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच एकाच टर्ममधील दोन विरोधी पक्षनेते गळाला लावण्याची कामगिरी भाजपाने चोख पार पाडली आहे.
भाजपा प्रवेशानंतरही राधाकृष्ण विखे-पाटील 'विरोधी पक्षनेते'च; वाचा कसे अन् कुठे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 6:00 PM