पावसामुळे अभूतपूर्व परिस्थिती;अद्याप केंद्राची मदत का नाही? - राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 02:17 PM2018-07-10T14:17:25+5:302018-07-10T14:24:01+5:30
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून मुंबई, कोकण, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतरही विभागात मागील अनेक तासांपासून होत असलेल्यामुसळधार पावसाचा मुद्दा उपस्थित केला.
नागपूर - पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना अद्याप केंद्राकडून मदत का आलेली नाही? अतिवृष्टीग्रस्त भागाची हवाई पाहणी का झालेली नाही?लष्कराला सतर्कतेचे आदेश का देण्यात आलेले नाहीत? असे अनेक प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज सरकारसमोर उपस्थित केले. मंगळवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून मुंबई, कोकण, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतरही विभागात मागील अनेक तासांपासून होत असलेल्यामुसळधार पावसाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागपूर शहर जलमय झाले तेव्हा संपूर्ण सरकार नागपूरमध्ये हजर असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवले. पण हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा हा वेग मुंबई शहरात दिसून येत नाही. संपूर्ण मुंबई ठप्प झाल्याचे चित्र असून, पुढील काही तास पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारीच्या काय उपाययोजना केल्या आहेत? केंद्राकडून मदत मागण्यात आली आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या सर्व उपाययोजनांमध्ये सरकारला संपूर्ण सहकार्य करायला विरोधी पक्ष तयार आहे, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.