राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली पश्चिम रेल्वेच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 02:34 PM2017-10-03T14:34:03+5:302017-10-03T14:39:38+5:30
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेतली.
मुंबई- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेतली. यावेळी एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेतील पीडित कुटुंबांची परिस्थिती जाणून घेण्याची मागणी विखे पाटील यांनी केली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले अनेक जण कुटुंबाचा एकमेव आर्थिक आधार होते, त्यामुळे फक्त एकरकमी आर्थिक मदत देऊन अशा कुटुंबांना दिलासा मिळणार नाही, असं विखे-पाटील यांनी म्हंटलं आहे. पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वे सेवेत सामावून घेण्याची मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वेमंत्र्या़नाही पत्र लिहिलं असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत.
दहशतवाद्यांनी पसरवली अफवा? भोईवाडा पोलिसात तक्रार अर्ज दाखल
सर्वसामान्यांना टार्गेट करुन त्यांच्यात अफवा पसरवून मानवी जीव घेणारी अतिरेकी संघटना सध्या हातपाय पसरत आहे. यात कोणत्याही शस्त्राचा वापर न करता मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा बळी घेण्यात येतो. हल्ली कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि खबऱ्यांच्या नेटवर्कमुळे घातपातीच्या कारवाईला आळा बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेला चेंगराचेंगराचाही प्रकार घातपात असू शकतो, असा दावा करत एक तक्रार अर्ज भोईवाडा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) या घटनेचा तपास करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष फैजल युसूफ बनारसवाला यांनी या अर्जाद्वारे भोईवाडा पोलिसांकडे केली आहे. जाणीवपूर्वक अफवा पसरवून हा घातपात घडवण्यात आला आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
शुक्रवारी नेमके काय घडले परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर?
कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने शुक्रवारी खरी ठरली. एलफिन्स्टन रोड स्थानकावर शुक्रवारी (29 सप्टेंबर )सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी होऊन 8 महिला आणि एका लहान मुलासह तब्बल 23 जणांचा यात बळी गेला, तर 39 प्रवासी जखमी झाले. तर शनिवारी उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची ही पहिलीच घटना आहे. देशभरात नवरात्रीचा उत्साह संचारलेला असताना दस-याच्या तोंडावर मुंबईकरांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. मुंबईच्या इतिहासात आणखी एका ‘ब्लॅक फ्राय डे’ची नोंद झाली.
टाइमलाइन
सकाळी ९.३० : परतीच्या पावसाची मुंबईत जोरदार हजेरी
९.४५ ते १०.१० : स्थानकांवर गर्दीचे प्रमाण वाढले
१०.३० : रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती
१०.३३ : स्थानिकांचा एल्फिन्स्टन स्टेशन मास्तरला फोन
१०.४५ : स्थानिकांचा मदतीसाठी पुढाकार
११.०० : सर्व पोलिस स्थानकांना अलर्टच्या सूचना
११.३० : एल्फिन्स्टन दुर्घटनेत तीन प्रवासी ठार झाल्याचे वृत्त
११.३२ : रेल्वे पोलीस व सुरक्षा बलाचे अधिकारी घटनास्थळी
११.३८ : केईएम रुग्णालयात तीन मृत्यूंचा दुजोरा
११.४५ : केईएममधून १५ प्रवासी ठार झाल्याची माहिती
११.५० : पालिकेसह शासकीय यंत्रणेचे मदतकार्य
१२.०० : एनडीआरएफचे पाच जवान घटनास्थळी दाखल
१२.१० : वरिष्ठ रेल्वे अधिका-यांकडून अपघात स्थळाची पाहणी
१२.२५ : केईएममधून
२२ जण ठार झाल्याची माहिती