मुंबई - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तसेच आगामी आठवडाभरात कार्यकर्त्यांशी बोलून कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वामुळे पराभव झाला असल्याचं सांगितले. सुजयच्या विजयाचं श्रेय शिवसेना-भाजपाचं आहे. राज्यात काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे आगामी काळात काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडतील असे संकेत मिळत आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपाची यशस्वी घोडदौड पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी विधानसभा निवडणूक सोपी नसल्याचं दिसत आहे. राज्यात काँग्रेसच्या खराब कामगिरीची जबाबदारी राज्यातील नेत्यांची आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अनेक जण शिवसेना-भाजपाचीही वाट धरू शकतात.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसशी फारकत घेत नेतृत्वाबद्दल बंड पुकारलं आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपा तसेच शिवसेनेच्या व्यासपीठावर जाहीरपणे युतीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे निकालानंतर विखे पाटील पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील हे निश्चित झालं आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे यांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा तब्बल 2 लाख 81 हजार 474 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची बनवली होती. पवारांनी जोर लावूनही राष्ट्रवादीला मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली.
अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: माझा हट्ट पुरविण्यासाठी नगर सक्षम : डॉ.सुजय विखे
मतमोजणीच्या सुरुवातीपासून डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली. डॉ.सुजय विखे यांना 7 लाख 04 हजार 660 मते मिळाली तर त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मते मिळाली. सर्वच मतदारसंघातून विखे यांना लीड मिळाली आहे. सवार्धिक लीड राहुरी मतदारसंघातून मिळाले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 54 हजार 248 मतदार असून यंदाच्या निवडणुकीत 64.26 टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना 6 लाख 3 हजार 976 मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना 3 लाख 95 हजार 569 मतं मिळाली होती.