मुंबई - डीमार्ट या देशभर पसरलेल्या रिटेल चेनचे मालक राधाकृष्णन दमानी यांनी मुंबईत तब्बल 1 हजार कोटी रुपयांचं घर खेरदी केलं आहे. मुंबई शहरातील सर्वात पॉश परिसर असलेल्या मलबार हिल येथील घराची त्यांनी खरेदी केली. दमानी यांनी खेरदी केलेल्या घराचं क्षेत्रफळ 5752. 22 स्केवर फूट आहे. मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अलिशान एरियात हा मोठा प्लॉट आहे. मात्र, वन रुम किचन ते स्वप्नमहालपर्यंतचा त्यांचा प्रवास केवळ महेनत, स्वकर्तृत्व आणि बुद्धीमत्तेच्या जोरावरचा आहे.
दमानी यांनी खरेदी केलेल्या घराची किंमत बाजार भावानुसार 724 कोटी रुपये एवढी आहे. पुराचंद रॉयचंद अँड सन्स, परेशचंद रॉयचंद अँड सन्स आणि प्रेमचंद रॉयचंद सन्स यांच्याकडून दमानी आणि त्यांच्या भावाने हे घर खेरदी केले आहे. या खरेदीसाठी त्यांनी तब्बल 30 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी दिली आहे. 31 मार्च 2021 रोजी या खरेदीचा व्यवहार झाला. दमानी यांचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता, मुंबईतील टेनिमेंट ब्लॉकच्या अपार्टमेंटमधील वन रुम किचनमधून त्यांनी या भव्यदिव्य स्वप्नातील महालापर्यंतचा प्रवास गाठला आहे. डिमार्टच्या माध्यमातून एव्हुन्यू सुपरमार्केट या देशभर पसरलेल्या रिटेलर शॉपचे ते मालक आहेत. फोर्ब्स इंडियाच्या 2020 मधील गर्भश्रीमंत लोकांच्या यादीत दमानी यांचं नाव असून त्यांची संपत्ती 15.4 बिलियन्स डॉलर एवढी आहे.
मुंबईत स्वप्नातलं घर खरेदी करणे ही उद्योजकांसाठी नवी गोष्ट नाही. यापूर्वी 2015 मध्ये पुनावाल समुहाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी 750 कोटी रुपयांना आयकॉनिक लिंकन हाऊसची खरेदी केली होती. कोरोनामुळे मुंबईतील बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला होता. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा गतीमान हालचाली सुरु झाल्या असून या क्षेत्राने पुन्हा उभारी घेतली आहे. त्यामुळेच, महिनाभराच्या फरकातच या क्षेत्रात मालमत्ता खरेद-विक्री 112 टक्क्यांनी वाढली आहे. मिस्टर व्हाईट म्हणून प्रसिद्ध
राधाकृष्ण दमानी हे नेहमी पांढरं शर्ट आणि पांढरा पँट घालतात आणि त्यांची हीच स्टाईल त्यांची ओळख आहे. त्यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. ते शेअर बाजारातील एक प्रसिद्ध जानकार आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवहारी ज्ञानाच्या जोरावर D-Mart नावाने देशातील यशस्वी रिटेल चेन चालवली. दमानी हे मीडिया आणि मार्केटिंगपासून दूर राहातात. तसेच, ते सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह नसतात. मार्च 2017 मध्ये एव्हेन्यू सुपरमार्केटचा आयपीओ आल्यानंतर त्यांना रिटेल किंग म्हटलं जाऊ लागलं. त्यांनी 2002 मध्ये मुंबईतील एका उपनगरातून छोटेखानी स्वरुपात व्यवसायाची सुरुवात केली होती. याशिवाय त्यांनी तंबाकू, बिअर उत्पादनसारख्या अनेक कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले आहेत. अलीबागच्या 156 खोल्यांच्या ब्लू रेसॉर्टचे ते मालक आहेत.