Join us

त्रस्त प्रवासी... राधे माँचा सत्संग अन् संताप; मुंबई विमानतळावरचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 6:58 AM

प्रवाशांच्या घोषणाबाजीनंतर त्या गर्दीत घुसल्या आणि...

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द तरी करावी लागली किंवा त्यांचे पुनर्नियोजन तरी करावे लागले. त्यामुळे विमान प्रवाशांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले. तीन दिवसांपूर्वी अशाच एका मन:स्तापाला मुंबईविमानतळावर प्रवासी सामोरे जात असताना तिथे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ अवतरल्या. प्रवाशांना शांत राहून देवाचे नामस्मरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, तेथील एका प्रवाशाशीच त्यांचा वाद झाल्याने त्यांचा संतापाचा पारा चढला आणि तेथून माँ तरातरा चालत्या झाल्या.

त्याचे झाले असे की, १२ जून रोजी एअर इंडियाचे एआय-९८१ हे विमान दोहा येथे जाण्यासाठी सायंकाळी साडेसात वाजता आकाशात झेपावणे अपेक्षित होते. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळामुळे विमान हँगरमध्येच लटकले होते. विमान रद्द झाले की, वेळापत्रकाचे पुनर्नियोजन झाले, याचा काही थांगपत्ता प्रवाशांना लागत नव्हता. रात्रीचे नऊ वाजले तरी एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत घोषणा होईना. तेव्हा कातावलेल्या प्रवाशांनी विमान कंपनीच्या काउंटरबाहेरच ठिय्या मांडत कंपनीच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.

माँजींना पाहून एका प्रवाशाने त्यांचाच जयजयकार सुरू केला. मात्र, प्रवाशांना शांततेचे आवाहन करतानाच राधे माँ यांची एका प्रवाशाशी वादावादी झाली. अखेरीस संतापाच्या भरात ‘शट युअर माऊथ’ असे ओरडत राधे माँ तेथून तरातरा निघून गेल्या. जवळपास अर्धा तास हा प्रकार विमानतळावर सुरू होता.  अखेरीस साडेदहा वाजता एअर इंडियाचे विमान दोहाच्या दिशेने झेपावले... परंतु षडरिपुंवर विजय मिळविण्याचे आवाहन करणाऱ्या संतगटातील राधे माँच प्रत्यक्ष चिडलेल्या पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, हेही खरेच.

प्रवाशांची घोषणाबाजी अन्...

प्रवाशांची घोषणाबाजी सुरू असताना तेथून राधे माँ जात होत्या. त्यांनी आपला मोर्चा प्रवाशांकडे वळवला. थेट प्रवाशांच्या गर्दीत घुसत प्रवाशांना शांत राहण्याचे व देवाचे नाव घेण्याचे आवाहन राधे माँ करू लागल्या.

टॅग्स :राधे माँमुंबईविमानतळ