मुंबई : कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ यांनीही प्रथमच बोरीवलीच्या कोरा मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यांच्या आधी रांगेत चार-पाच जण मतदानाकरिता उभे असताना त्यांना विशेष वागणूक देत मतदान करू देण्यात आले. त्यामुळे रांगेतील मतदारांमध्ये आणि निवडणूक कर्मचाऱयांमध्ये बाचाबाची झाली.
दुपारी एकच्या सुमारास राधे माँ एका आलिशान गाडीतून त्यांच्या अनुयायांसमवेत मतदान केंद्रावर आल्या. त्यांच्यासोबत फोटोग्राफर,व्हिडिओग्राफर असा ताफा होता. एका हातात छोटेसे तिशूळ आणि दुसऱया हातात पर्स सावरत त्या केंद्रात गेल्या. मात्र त्यांच्या आधी रांगेत असलेल्यांचा बाजूला सारून त्यांना मतदान करू देण्यात आले. त्यामुळे मतदारांमध्ये बाचाबाची झाली.
आपण यंदा प्रथमच मतदान करत आहोत, असे राधे माँ यांनी सांगितले. देशातील परिस्थिती पाहता मतदान काही चांगल्या गोष्टींना पाठिंबा दिला पाहिजे असे आपल्याला वाटले. म्हणून आपण मतदानाचा निर्णय घेतला, असे राधे माँ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.