राधे, राधे कसे काय आहात तुम्ही सगळे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 04:37 AM2019-10-18T04:37:28+5:302019-10-18T04:38:23+5:30
ड्रीम गर्ल हेमा मालिनीची मराठीतून साद : महिलांच्या प्रश्नांना दिली उत्तरे
मुंबई : राधे.. राधे.. कसे काय आहात तुम्ही सगळे? असे म्हणत, ती आली अन् तिने उपस्थित महिलांची मने जिंकली. महिला आधार भवन, महिला संघटनेतर्फे बोरीवली मतदारसंघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मथुरेच्या खासदार आणि सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांनी उपस्थिती दर्शवली होती. या वार्तालापाला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना खासदार हेमा मालिनी यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
बोरीवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील राणे यांच्या प्रचारासाठी आयोजित या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजकारणात उतरल्यानंतर राजकारणातील आयुष्य चांगले की एक कलाकार म्हणून जे आयुष्य जगताय ते चांगले, असा प्रश्न हेमा मालिनी यांना विचारण्यात आला. यावर माझे कलाकार म्हणूनचे आयुष्यच चांगले आहे, असे सांगत राजकारणातील अनुभवही आपण घेत आहोत तसेच लोकांमध्ये जाणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे यात आपल्याला समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सिनेमात दिग्दर्शक असतो मात्र इथे स्वत: तुम्हीच दिग्दर्शक आणि निर्माते, कलाकार असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते; कारण शेवटी जबाबदारी तुमची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत हेमा मालिनी यांना प्रश्न विचारला असता मुळात आज महिला इतक्या सशक्त आहेत की, त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही, तर त्याही पुढे आहेत. आजही काही भागात महिलांना कमी प्रमाणात संधी दिली जाते, तिथे जागरूकता घडविण्याची गरज आहे. राजकारणातील आपली जुनी आणि आठवणीतली गोष्ट सांगताना अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण त्यांनी सांगितली. सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणून आपल्या आईचा उल्लेख करताना त्या भावुक झाल्या. दरम्यान, सुनील राणे २५ वर्षांहून अधिक काळ भाजपचा कार्यकर्ता म्हणून सेवा करत असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी बोरीवलीकरांना केले.