Join us  

मोबाइलमधून येणारी किरणे आरोग्याला घातक नाहीत...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 8:28 AM

मुंबई परिक्षेत्रात १४९३ बेस ट्रान्सिव्हर स्टेशन्सची चाचणी

मुंबई : मोबाइल फोन किंवा टॉवर्समधून उत्सर्जित होणाऱ्या निम्न पातळीच्या आणि आयनीकरण न करणाऱ्या किरणोत्साराचा मानवी आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही, असे मत नवी दिल्लीच्या एम्समधील न्यूरोसर्जरीचे वरिष्ठ सहायक प्राध्यापक डॉ. विवेक टंडन यांनी व्यक्त केले.दूरसंचार विभागाच्या मुंबई परवाना सेवा क्षेत्राद्वारे शुक्रवारी ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड किरणोत्सार आणि सार्वजनिक आरोग्य’ या विषयावर जागरुकता वेबिनार घेण्यात आले होते. ग्राहकांसाठी विश्वासार्ह दूरसंचार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह मोबाइल टॉवर्सच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि मोबाइल टॉवरच्या वाढत्या गरजेबद्दल जागरूक करण्यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्राध्यापक डॉ. विवेक टंडन बोलत होते. काय सांगते संशोधन ?मोबाइल टॉवर्सच्या किरणोत्सर्गामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भात वैज्ञानिक संशोधनानुसार आढळून आले आहे की, सेल टॉवरमधून कमी शक्तीच्या, आयनीकरण न करणाऱ्या किरणोत्साराचा मानवी आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. दूरसंचार विभागाच्या मुंबई सेवा क्षेत्र विभागाचे वरिष्ठ उपमहासंचालक अश्वनी सलवान यांनी मोबाइल टॉवर्सचे महत्त्व आणि अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात दूरसंचार विभागाची भूमिका स्पष्ट केली.मोबाइल टॉवरच्या चाचणीसाठी...मुंबई परवानाकृत सेवाक्षेत्राने एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत १४९३ बेस ट्रान्सिव्हर स्टेशन्सची चाचणी केली. त्यात सर्व बी.टी.एस. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड किरणोत्सार हे  दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार अनुरूप आढळले. मोबाइल टॉवरच्या किरणोत्साराची सर्व माहिती दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्वसामान्य नागरिक नाममात्र शुल्क भरून त्यांच्या परिसरातील कोणत्याही मोबाइल टॉवरच्या चाचणीसाठी विनंती करू शकतात, अशी माहिती देण्यात आली.वेबिनारमधील विविध सत्रांचा आढावा घेत मुंबई परवानाकृत सेवा क्षेत्राची आकडेवारी सादर केली. कार्यशाळेत सामान्य नागरिक, सरकारी अधिकारी, रहिवासी कल्याणकारी संघटना, विद्यार्थी, डॉक्टर, दूरसंचार सेवा प्रदाते, पायाभूत सुविधा पुरवठादार आणि इतर अधिकारी यांच्यासह १०० हून अधिक जण सहभागी झाले. - हौशीला प्रसाद, उपमहासंचालक (अनुपालन)