Join us

कर्करोग उपचारासाठी रेडिएशन थेरपी वरदान

By admin | Published: May 03, 2015 5:44 AM

शात शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनचा वापर करून कर्करोगावर उपचार केले जातात. पण नवीन रेडिएशन थेरपी ही फक्त कर्करोगबाधित

मुंबई : देशात शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनचा वापर करून कर्करोगावर उपचार केले जातात. पण नवीन रेडिएशन थेरपी ही फक्त कर्करोगबाधित पेशींवर उपचार करते. यामुळे आजूबाजूच्या चांगल्या पेशींवर रेडिएशनचा परिणाम होत नाही आणि दुष्परिणाम कमी होतो, असे मत अ‍ॅस्ट्रो परिषदेत सहभागी झालेल्या ओन्कोलॉजिस्टनी मांडले.द अमेरिकन सोसायटी फॉर रेडिएशन ओन्कोलॉजीतर्फे आयोजित करण्यात येणारी अ‍ॅस्ट्रो परिषद मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, २ मे रोजी या परिषदेची सुरुवात झाली. या परिषदेत अनेक देशांतील तज्ज्ञ ओन्कोलॉजिस्ट सहभागी झाले आहेत. भारतात दरवर्षी ८ लाख नवीन कर्करोग रुग्ण आढळून येतात. यात महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग तर पुरुषांमध्ये हेड अ‍ॅण्ड नेकचा कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. यावर उपचार करण्यासाठी रेडिएशनचा वापर केला जातो. रेडिएशनचे दुष्परिणाम १० ते १२ वर्षांपूर्वी जास्त प्रमाणात दिसून यायचे. पण, नवीन रेडिएशन थेरपीमुळे शस्त्रक्रियेशिवाय कर्करोग बरा होऊ शकतो, असे ओन्कोलॉजिस्ट डॉ. कौस्तुभ तालापात्रा यांनी सांगितले. ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. पण कर्करोगावर उपचार करणाऱ्या सुविधा उपलब्ध नाहीत. तिथे कर्करोगाचे उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रुग्णालयाच्या अध्यक्ष टीना अंबानी यांनी सांगितले.