कल्याण-खेळाच्या माध्यमातून आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रेडिओलॉजी प्रिमियर लीग क्रिकेट आरपीएल स्पर्धेचे विजेतेपद मुंबई लिजेंडने पटकावले. तर संपूर्ण स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करणारा नाशिक चॅम्पस् हा या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला. यंदाची आठवी रेडिओलॉजी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा मान यंदा महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या कल्याण झोनला पहिल्यांदाच मिळाला होता. कल्याण झोन अंतर्गत झालेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांतील १६ संघातून ३०० च्या आसपास रेडिओलॉजिस्ट खेळाडू सहभागी झाले होते. अंबरनाथ येथील ऑर्डीनन्स फॅक्टरी मैदान आणि भिवंडीतील तीन अशा चार मैदानांवर गेले दोन दिवस हे क्रिकेटचे सामने पार पडले.
समाजाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर मंडळींकडून आरोग्याचा संदेश देण्यासह या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या कल्याण झोनतर्फे शहापूरमधील उठावा, भातसई, कुंदन पाडा येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना रक्षा उपक्रमाअंतर्गत यावेळी विविध क्रीडा साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. महाराष्ट्र रेडिओलॉजीस्ट संघटनेच्या रक्षा प्रकल्पअंतर्गतही मदत करण्यात आल्याचे महाराष्ट्र रेडिओलॉजीस्ट संघटनेचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. डॉक्टरांचा हा फिटनेस अतिशय कौतुकास्पद असल्याचे कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गांधी, सचिव प्रदीप सांगोले, खजिनदार संदीप महाजन, माजी अध्यक्ष शैलेश संघनानी, राष्ट्रीय रेडिओलॉजिस्ट संघटनेचे खजिनदार समीर गांधी, माजी राष्ट्रीय सचिव, डॉ. संदीप कवताले, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत ओंकार, रक्षा उपक्रमाच्या समन्वयिका डॉ. रौनक लक्ष्मी शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरीता रेडीओलॉजिस्ट संघटना कल्याणचे अध्यक्ष डॉ. हरीश शहाददपुरी, सचिव संदेश रोठे, डॉ. निहार ढोक, डॉ. राजेश मुळे, डॉ. राजेश कौरानी आदींनी मेहनत घेतली.