मुंबई : रा.फ. नाईक शालेय संघाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज शालेय संघाचा ९-७ असा पराभव करुन शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात हॅट्ट्रिक साजरी केली. मुलांच्या गटात महात्मा गांधी शालेय संघाने विजेतेपद मिळवले.अमर हिंद मंडळाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाईक संघाने सांघिक खेळाच्या जोरावर वर्चस्व मिळवले. नाईक संघाच्या श्रद्धा शिंदे (२.३० व ३.१० मिनिटे), नेहा मगर (२.२० व ३.३० मिनिटे) यांनी संरक्षणात तर आक्रमणात श्वेता जाधव २ बळी आणि पूजा फरगडेने ४ बळी मिळवले. शाहू शाळेच्या अश्विनी मोरे (१, नाबाद १ मिनिट संरक्षण आणि २ बळी) वगळता अन्य खेळाडूंना छाप पाडण्यात अपयश आले. नाईक संघाने २ गुणांनी मात करत सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली.मुलांच्या गटात महात्मा गांधी संघाने रा.फ. नाईक संघावर १४-९ अशी मात करत बाजी मारली. अष्टपैलू दीपेश खेराडे (२.१०, २.२० मिनिटे), ओमकार पारधिपे (२, १.५० मिनिटे) यांनी आक्रमणातही दबदबा कायम ठेवला. रा.फ. नाईकच्या आकाश तोरणेने आक्रमणात एकाकी झुंज देत ३ बळी मिळवले. मात्र इतर खेळाडूंची त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
रा.फ. नाईक संघाची हॅट्ट्रिक
By admin | Published: January 09, 2017 4:01 AM