राफेल विमानं उत्तम अन् आवश्यकच, पण...; शरद पवारांनी मोदींवर थेट हल्ला टाळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:35 PM2018-09-27T16:35:19+5:302018-09-27T16:36:21+5:30
शरद पवारांना राफेल करारातील घोटाळ्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर, संरक्षणमंत्र्यांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, पण त्या बोलत नाहीत,
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणाबाबत बोलताना संयमी भूमिका घेतल्याचे दिसून आले. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पवार यांनी राफेलसंदर्भातील दोन्ही बाजू समजावून सांगितल्या. राफेलवरुन मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र, मूळात या कराराबाबत योग्य ती माहिती समजावून घेणं आवश्यक आहे. देशाला राफेल विमानांची गरज आहे, राफेल विमान उत्तम आहेत, असे म्हणत पवार यांनी आपली भूमिका मांडली.
शरद पवारांना राफेल करारातील घोटाळ्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर, संरक्षणमंत्र्यांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, पण त्या बोलत नाहीत, असे ते म्हणाले. तसेच विरोधक संसदीय समिती स्थापनेची मागणी करत असतील, तर सरकारने समिती स्थापन करुन याची चौकशी करावी, असेही पवार यांनी म्हटले. मात्र, विरोधकांची दुसरी बाजू म्हणजे शहाणपणाचं लक्षण नाही. राफेल विमान आणि त्यांच्या तांत्रिक बाजू जाहीर करणं मला आवश्यक वाटत नाही. कारण, या विमानाच्या तांत्रिक बाजू जाहीर केल्यास तो देशाच्या सुरक्षेला धोका ठरेल. आपल्या शत्रुराष्ट्राला विमानाच्या तीव्रतेची जाणीव होईल, त्यामुळे ही मागणी शहाणपणा नसल्याचं पवार यांनी म्हटले.
राफेल हा बोफर्स यांचा सदर्भ देताना बोफर्समधून कुठं काय बाहेर आलं ? असे म्हटले आहे. राफेल करारावरुन मोदींना टार्गेट करण्यात येत आहे. मात्र, पवार यांनी मोदींवर थेट टीका करण्याचे टाळले आहे. या प्रकरणामुळे सामान्य नागरिक मनातून मोदींना वैयक्तिक दोषी मानत नाहीत, असे म्हणत पवारांनी मोदींवर थेट टीका करणे टाळले.