मुंबई/पुणे - राज्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून राजकीय नेत्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. जालना, बीड, धाराशीव, लातूर, नंदूरबार, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. सोमवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरात जाळपोळ करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर काही नेत्यांच्या घरांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांच्याही घरापुढे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषदेतून आंदोलनातून होणाऱ्या हिंसक घटनांवरुन नाराजी दर्शवली. त्यानंतर, जरांगे पाटील यांनीही आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र, आंदोलकांकडून राजकीय नेत्यांकडे राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यु झाल्याने ते उपचार घेत आहेत. त्यातच, अजित पवारांचे शिलेदार आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केलीय. तसेच, मराठा बांधवांना आवाहनही केलंय. दरम्यान, अजित पवार यांच्या बारामती निवासस्थानी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थान असलेल्या सह्योग सोसायटी येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बारामतीपाठोपाठ आता दौंडमध्येही अजित पवारांना विरोध होताना दिसत आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवारांनी येऊ नये, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली होती. त्यानंतर दौंड तालुक्यातील दौंड शुगर येथे अजित पवारांना मोळी पुजनाला बोलावू नका, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाने तसे पत्रही पोलीस प्रशासनाला दिलं आहे.
अमोल कोल्हेंना राजीनामा देण्याची मागणी
बीड जिल्ह्यात हिंसाचाराच्या दोन मोठ्या घटना घडल्या. त्यामध्ये, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरी जाऊन त्यांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तर, दुसरीकडे नगरपालिकेच्या इमारीलाही आग लावल्याची घटना घडली होती. त्यामुळे, राज्यात वातावरण अधिक गढूळ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नेते मंडळींकडून शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनाही एका आंदोलकाने फोन करुन राजीनामा देण्याची मागणी केली आहे.