रॅगिंग नेहमीचेच; ते तू सहन कर, पायलला वरिष्ठांनी दिला होता अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:19 AM2019-05-30T06:19:07+5:302019-05-30T06:19:19+5:30
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या रॅगिंगबाबत तिच्या आईने लेक्चरर, तसेच युनिट हेड डॉ. चिंग लिंग यी यांच्याकडे धाव घेतली.
मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या रॅगिंगबाबत तिच्या आईने लेक्चरर, तसेच युनिट हेड डॉ. चिंग लिंग यी यांच्याकडे धाव घेतली. मात्र, त्यांनी असे प्रकार या ठिकाणी नेहमीच होत असतात सांगून दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी पायलसमोर आरोपी डॉक्टरांची बाजू घेत, पायलला हा प्रकार सहन करावा लागेल, असे सांगून पाठवून दिल्याचा आरोप पायलच्या आईने अबेदा सलीम तडवी यांनी पोलीस जबाबात केला आहे.
अबेदा यांच्या जबाबानुसार, १३ मे रोजी मुलीला होत असलेल्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे तक्रार करण्यासाठी गेल्या. मात्र, तेथील शिपायाने त्यांना भेटू न देता टपालामार्फत तक्रार अर्ज देण्यास सांगितला. त्यानुसार, त्यांनी कार्यालयात अर्ज दिला. तेव्हाच पायल हिचे पती सलमान तेथे आले आणि तक्रार अर्जामुळे पायल हिला आणखीन त्रास होईल, म्हणून तक्रार अर्ज मागे घेतला. तेथून त्यांनी पायलची वॉर्डन मनीषा रत्नापारखी यांना भेटून पायलला होत असलेल्या अत्याचाराबाबत सांगून तिला सहकार्य करण्याबाबत विनंती केली, असे पायलच्या आईने जबाबात नमूद केले आहे.
पुढे, पायल हिच्या लेक्चरर डॉ. चिंग लिंग यी यांना भेटून घडलेला प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी असे प्रकार या ठिकाणी नेहमीच होत असल्याचे सांगत पायलला त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. १४ मे रोजी पायलने आईला फोन करून सांगितले की, चिंग ली यांनी तिन्ही डॉक्टरांना केबिनमध्ये बोलावत त्यांच्याच बाजूने बोलून सर्व काही सहन करावे लागतील, असे सांगितले. वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे तिन्ही डॉक्टरांकडून तिच्यावर अत्याचार वाढल्याचेही आईचे म्हणणे आहे. मात्र, पोलीस जबाबात चिंग लिंग यांनी हे आरोप नाकारले आहेत.
>आत्महत्येच्या पाच तासांपूर्वी आईकडे दर्शविली भीती
२२ मे रोजी ३.४९ वाजता पायलने आईला फोन केला. चिंग ली यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर, तिन्ही डॉक्टर महिलांनी तिची रॅगिंग करत तिला जास्त त्रास देणे सुरू केल्याचे सांगितले. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिला टोमणे मारत, अखेरच वर्ष पूर्ण करून देणार नसल्याची धमकी दिली. ती जेवणासाठी बाहेर गेली असता, या तिघींनी तिला जेवणासाठी बाहेर का गेलीस, तुझे काम कोण करणार? बाहेर जेवायला जाऊन तू तुझे बत्तीस दात दाखवून फोटो काढले. ते दात पाडते, असे म्हणत अपमानित केले. पुढे तिला ओटीमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचे सांगितले. त्यात, डिलिव्हरीनंतर केअर वॉर्डमध्ये तुला टाकून देऊ. तुझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करू न देताच हाकलून देऊ, अशी धमकी दिली. याच भीतीमुळे पायल पूर्णपणे खचली होती. तिला धीर देत त्यांनी रूमवर जाण्यास सांगितले. उद्या येऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार देतो, असे सांगून आईने तिला समजावल्याचे तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पायलला समजावून रूममध्ये पाठविल्यानंतर, आईने तिच्या मोबाइलवर कॉल केले. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. झोपली असेल, म्हणून तिने दुर्लक्ष केले. रात्री ९.१४ च्या सुमारास तिच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर पडल्याचे आईने सांगितले.