ज्वलंत प्रश्नावर राहुल गांधी आक्रमक
By admin | Published: April 13, 2016 02:59 AM2016-04-13T02:59:54+5:302016-04-13T02:59:54+5:30
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या धुराने अवघी मुंबई त्रस्त झाली असतानाच, मंगळवारच्या राहुल गांधी यांच्या देवनार डम्पिंग ग्राउंडच्या भेटीकडे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागले होते.
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या धुराने अवघी मुंबई त्रस्त झाली असतानाच, मंगळवारच्या राहुल गांधी यांच्या देवनार डम्पिंग ग्राउंडच्या भेटीकडे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागले होते. भेटीच्या वेळी राहुल गांधी नक्की काय बोलणार? देवनारमधील स्थानिकांशी संवाद साधणार का? सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढणार का? असे अनेक प्रश्न मुंबईकरांना पडले होते. राहुल यांनीही या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारसह राज्यातल्या सरकारवर घणाघाती टीका केली.
डम्पिंगच्या प्रश्नावर स्थानिकांना त्यांच्याशी संवाद साधायचा होता, पण तो न झाल्याची सल रहिवाशांनी बोलून दाखविली. तथापि, मुंबईला सध्या सतावणारा सर्वात ज्वलंत प्रश्न बनलेल्या डम्पिंग प्रकरणी राहुल गांधी संवेदनशील असल्याचे या भेटीतून दिसून आल्याचे स्थानिकांनी बोलून दाखविले.
सोमवारी नागपूर भेटीवर असलेले राहुल गांधी मंगळवारी मुंबईत येणार, म्हणून मुंबई काँग्रेसने त्यांच्या स्वागताचे फलक मुंबईभर लावले होते. महत्त्वाचे म्हणजे, ‘बेस्ट’च्या बसेसवरही राहुल यांच्या स्वागताचे फलक झळकले होते. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि देवनार डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर मुंबई काँग्रेसने राहुल यांच्या स्वागताचे फलक लावले होते. राहुल यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असतानाच देवनार डम्पिंग ग्राउंडच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच येथे राहुल गांधी यांना पाहता यावे आणि आपल्या समस्या मांडण्याासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
आता तरी प्रश्न सुटणार का ?
देवनार प्रश्नाची नोंद केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही घेतली आहे. शिवसेनेचे मुंबईतील आमदार, खासदार, महापौर, पर्यावरण तेसच आरोग्यमंत्र्यांनी व आयुक्तांनी देवनारला भेट दिली, त्यांनतर मंगळवारी काँग्रेसचे
उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही डम्पिंग ग्राउंडला भेट दिली. आता तरी हा प्रश्न सुटेल का असा प्रश्न स्थानिकांच्या मनामध्ये आहे.
सकाळी ११ वाजता राहुल गांधी येणार म्हणून सकाळपासून कार्यकर्त्यांसह रहिवाशांची गर्दी झाली होती. देवनार डम्पिंग ग्राउंडच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थानिक नागरिकांसह अबाल-वृद्धांसह लहान मुले आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोतावळा जमला होता. राहुल गांधी येण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वारातून आपल्याला प्रवेश मिळावा, म्हणून स्थानिक नागरिकांसह, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आटापिटा सुरू होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह कार्यकर्त्यांना येथे प्रवेश नाकारला होता. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत प्रवेशासाठी स्थानिकांची आणि कार्यकर्त्यांची पोलिसांशी हुज्जत सुरूच होती.
सकाळी ११ वाजता येणारे राहुल गांधी तब्बल दीड तास विलंबाने, म्हणजे दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास देवनार डम्पिंग ग्राउंडच्या मुख्य प्रवेशद्वारवर दाखल झाले. राहुल यांच्या वाहनांचा ताफा प्रवेशद्वारावर दाखल होतो, तोच कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या नावाचा जयघोष सुरू केला. मुख्य प्रवेशद्वारवर कार्यकर्त्यांसह स्थानिकांवर नजर टाकत, राहुल यांच्या वाहनांचा ताफा देवनार डम्पिंग ग्राउंडच्या मुख्य प्रवेशद्वारातून वेगाने आत दाखल झाला. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य प्रवेशद्वारानंतर उभारण्यात आलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत दाखल झालेल्या वाहनांच्या ताफ्यातून दुपारी १२.२५ वाजता राहुल गांधी डम्पिंग ग्राउंडवर उतरले.
राहुल गांधी वाहनातून खाली उतरताच त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, आमदार वर्षा गायकवाड, माजी आमदार कृपाशंकर सिंग, मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि चंद्रकांत हंडोरे यांनी डम्पिंग ग्राउंडवर आगेकूच केली. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डम्पिंगवर पाय ठेवताच, प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांनी त्यांना गराडा घातला आणि या गराड्यातच राहुल गांधी यांनी पुढील पंधराएक मिनिटे पदाधिकाऱ्यांसोबत डम्पिंगची पाहणी केली.
आमच्याकडेही लक्ष द्या...
डम्पिंग ग्राउंडची पाहणी करून राहुल गांधी यांच्या वाहनांचा ताफा झवेरी बाजारकडे रवाना होतो, तोच येथील कचरा वेचक महिलांनी प्रसारमाध्यमांकडे आपली व्यथा मांडली. कचरा वेचक महिलांच्या प्रतिनिधी म्हणून शंकुतला साळवे आणि पद्मिनी जगताप यांनी त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. त्या म्हणाल्या, ‘पहिल्यांदा सायनला डम्पिंग होते. ते डम्पिंग तेथून येथे देवनाराला हलवण्यात आले.
तेव्हा कधी काळी येथे रेल्वेने कचरा टाकला जात होता.
आज आम्ही येथे राहतो, त्याला चाळीसएक वर्ष झाली. आमची उपजिविका या डम्पिंग ग्राउंडवर आहे. कचरा वेचणाऱ्या किमान तीनएक हजार महिला तरी येथे वास्तव्य करत आहेत. त्यांच्या कुटुंबांचा प्रश्न आहे. आमचे एकच म्हणणे आहे. डम्पिंग हटवा अथवा हटवू नका, पण या संबंधीची कार्यवाही करताना आमचा विचार करा आणि आमच्याकडे लक्ष देत आमच्या रोजगाराचा प्रश्नही मिटवा.’
जरा, गरिबांकडेही बघा...
राहुल गांधी हे डम्पिंग ग्राउंडवरून बाहेर पडताच मुख्य प्रवेशद्वारबाहेर उपस्थित ‘उत्साही समाजसेवकां’नी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. याच वेळी स्थानिकांनीही पत्रकारांना गराडा घातला. तेव्हा स्थानिक नागरिकांकडे कोणीचेच लक्ष नव्हते. यावर संतप्त झालेल्या स्थानिकांनी ‘जरा गरिबांकडेही बघा...’ असे म्हणत पत्रकारांकडे रोष व्यक्त केला.
सर्वाधिक चर्चा झालेला प्रश्न
गेले अनेक महिने देवनार डम्पिंग ग्राउंडच्या आगीचा प्रश्न चर्चेमध्ये आहे. पालिकेमध्ये आरोप प्रत्यारोप तसेच पालिकेबाहेरही सत्ताधारी विरुद्ध विरोधक आणि सत्ताधारी युतीमधील बेदिलीही यानिमित्ताने समोर आली आहे. या प्रश्नाची विधिमंडळातही चर्चा झाली. देवनार येथील आगीच्या घटनेनंतर मुलुंड डम्पिंग ग्राउंडलाही आग लागण्याचा प्रकार उघडकीस आला. आता यापुढे कचऱ्याचे विघटन
रहिवासी संस्थांमध्येच करण्याचा पर्याय पुढे
येत आहे.