लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. देशातील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये राजाचा आत्मा आहे. ईव्हीएम शिवाय राजा निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील सभेत बोलताना केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता रविवारी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाली. या सभेद्वारे इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राहुल गांधी यांनी ईव्हीएमवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले विरोधी पक्षांना या मशिन खोलून दाखवा, त्या कशा चालतात ते आमच्या तज्ज्ञांना दाखवा. मशिनमधून जी कागदाची चिठ्ठी निघते त्याची मोजणी करा, पण निवडणूक आयोग नाही म्हणते. या सिस्टिमला त्याची मोजणी नको आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
शिवाजी पार्कवर जमलेले हे सगळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आहेत. लोक विचार करतात की आम्ही सगळे भाजपविरोधात, नरेंद्र मोदी या एका व्यक्तीविरोधात लढत आहोत, पण तसे नाही. आमची लढाई एका व्यक्तीविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात आहे, असेही ते म्हणाले. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मी एकटा चाललो नाही, देशातील सगळे विरोधी पक्ष व लोक माझ्याबरोबर चालले. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिला, युवांच्या प्रश्न, अग्नीवीरांचे प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा होती असे सांगत हा देश एकमेकांचा तिरस्कार करणारा नव्हे, तर एकमेकांवर प्रेम करणारा देश आहे, असे राहुल म्हणाले.
घाबरविल्याने नेते सोडून गेले...
याच प्रदेशचे वरिष्ठ नेता काँग्रेस सोडतात आणि रडून माझ्या आईला सांगतात सोनियाजी ‘मुझे शर्म आ रही है, मेरे में इस शक्ती से लढने की हिंमत नाही है, मैं जेल नही जाना चाहता हूं...’ हे एक नाही, अशा हजारो लोकांना घाबरविले आहे आणि ते सोडून गेले आहेत, अशा शब्दांत राहुल गांधींनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक असेच गेले नाहीत, शक्तीने त्यांचा गळा पकडून भाजपकडे नेले आहे, ते सगळे घाबरून गेले आहेत, असेही राहुल म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांचा मविआलाच टोला
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपावरुन सुरू असलेल्या गोंधळावरून महाविकास आघाडीला टोला लगावला. हुकूमशाही विरोधात आपल्या सर्वांना लढावे लागेल. एकत्र लढू किंवा वेगळे लढू, पण आपल्याला लढावे लागेल, असे आंबेडकर म्हणाले.
संविधान बदलण्यासाठी त्यांना ४०० पार हवंय: उद्धव ठाकरे
- भाजप एक फुगा आहे. मला खेद वाटतो की या फुग्यात आम्ही हवा भरली. दोन खासदार होते, आज ४०० पारचा नारा देत आहेत. संविधान बदलण्यासाठी, देशाचे नाव बदलण्यासाठी यांना ४०० पार हवेय, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
- ठाकरे म्हणाले, देश वाचला पाहिजे. व्यक्तीची ओळख ही देश असला पाहिजे. कोणी कितीही मोठा असला तरी देश मोठा असला पाहिजे. कोणीही राज्यकर्ता अमर पट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकूमशाह कितीही मोठी असला तरी ज्यावेळेस सर्व लोक एकवटात त्यावेळी हुकूमशाहीचा अंत होतो. आज ती वेळ आलेली आहे.
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन
राहुल गांधींनी शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. क्रेनमधून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार घातला. तसेच, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधींबरोबर प्रियंका गांधींही उपस्थित होत्या.
त्यांची गॅरंटी चालणारी नाही : पवार
- आज देशाची जी स्थिती आहे, त्यात बदल करण्याची गरज आहे. हा बदल आपण सगळे एकत्र येऊन घडवू शकतो. वेगवेगळी आश्वासने देऊन देशाला आतापर्यंत फसवले, त्यांना दूर करण्यासाठी मतदान करायचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सभेत बोलताना केले.
- मोदींची गॅरंटी ही चालणारी गॅरंटी नाही असे सांगत महात्मा गांधींनी याच मुंबईत इंग्रजांविरोधात छोडो भारतचा नारा दिला होता, त्याच मुंबईत आपण छोडो भाजप हा नारा द्यायला हवा, असे पवार म्हणाले.