स्वत:ने बोलून काय होतं, जनता ठरवते पंतप्रधान- फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 05:49 PM2018-05-08T17:49:54+5:302018-05-08T17:49:54+5:30
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकात आलेल्या राहुल गांधी यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना पहिल्यांदाच पंतप्रधानपदाबाबत जाहीर वक्तव्य केले.
मुंबई: पंतप्रधानपद घोषणा करून मिळत नसते, त्यासाठी लोकांनी निवडून द्यावे लागते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास २०१९ मध्ये मी पंतप्रधान होऊ शकतो, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांकडून देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा फडणवीस यांनी म्हटले की, पंतप्रधान व्हायला आवडेल, हे राहुल गांधींनी स्वत: बोलून काय फायदा आहे. त्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकात आलेल्या राहुल गांधी यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना पहिल्यांदाच पंतप्रधानपदाबाबत जाहीर वक्तव्य केले. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास पंतप्रधान होऊ शकतो. काही राज्यांत आम्ही रणनिती आखत आहोत. माझे राजकीय अंदाज २०१९ मध्ये खरे ठरतील. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीतही राहुल यांनी वर्तवले.