मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध भाजप व आरएसएसच्या विचारसणीशी जोडल्याने, आरआरएसएसच्या एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीचा दावा दाखल केला आहे. या दाव्यावरील सुनावणी माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे गुरुवारी आहे़ राहुल गांधी या दाव्यावरील सुनावणीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व व्यवसायाने वकील असलेले धृतीमान जोशी यांनी राहुल गांधी, काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) (सीपीआय) (एम) आणि सीपीआय (एम)चे नेते सीताराम येचुरी यांच्याविरोधात माझगाव दंडाधिकाऱ्यांपुढे खासगी तक्रार केली. फेब्रुवारी महिन्यात दंडाधिका-यांनी राहुल गांधी व येचुरी यांना समन्स बजाविले. त्यानुसार, राहुल गांधी व येचुरी यांना गुरुवारी दंडाधिका-यांपुढे उपस्थित राहायचे आहे.जोशी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, गौरी लंकेश यांच्या हत्येच्या २४ तास आधी राहुल गांधी यांनी एका सभेत म्हटले होते की, जे लोक भाजप व आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध बोलतात किंवा लिहितात, त्यांच्यावर दबाव आणला जातो, त्यांना मारले जाते किंवा त्यांची हत्या करण्यात येते. लंकेश यांची हत्या आरएसएस कार्यकर्त्याने केल्याचा आरोप येचुरी यांनी केला होता. कारण लंकेश उजव्या विचारसरणीविरोधात सातत्याने लिहीत आल्या.दंडाधिका-यांनी राहुल गांधी व सीताराम येचुरी यांना समन्स बजाविले. मात्र, सोनिया गांधी व सीपीआय (एम) यांना समन्स बजाविण्यास नकार दिला; तसेच त्यांचे नाव प्रतिवाद्यांच्या यादीतून वगळले. कोणी वैयक्तिकपणे कोणावर टीका केली असेल, तर त्यासाठी पक्षाला जबाबदार धरू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
राहुल गांधी आज माझगाव कोर्टात?, सोनिया गांधी यांचे नाव प्रतिवादी यादीतून वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 4:45 AM