मुंबई - नरेंद्र मोदी सरकार देशातील गरीबांच्या लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. यादरम्यान, आज सकाळी मुंबईमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवरुन पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर निशाणा साधला.
केंद्रातील मोदी सरकार केवळ श्रीमंतांसाठी काम करतेय. गरीबांच्या खिशातील पैसा श्रीमतांच्या खिशात ओतला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पुढे ते असंही म्हणालेत की, ''मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होते. आज तेच दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. म्हणजेच दर कोसळूनही जनतेला त्याचा फायदा होत नाही. गरीबांचे पैसे घेऊन 15-20 सर्वात श्रीमंताचे खिसे भरले जात आहेत. आज दररोज पेट्रोलचे दर का वाढताहेत ?, हा एवढा पैसा कुठे जातोय?'', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ''पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणा, अशी आमची मागणी आहे.
मात्र पंतप्रधानांना याचे काहीही घेणे-देणे नाही. नोटाबंदी केली, गब्बरसिंह टॅक्स लागू केला. त्यामुळे सर्व देश नाराज आहे. छोटा व्यापारी दु:खी आहेत. त्यासाठीच आमची लढाई सुरू आहे'', असं राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, ''देशातील विरोधीपक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएससविरोधात एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना आहे'',असे राहुल गांधी यावेळी म्हणालेत. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून भारताचे संविधान आणि भारताच्या सर्व संस्थांवर आक्रमण करण्यात येत आहे. सरकार श्रीमंतांची कर्ज माफ करत आहेत,असा आरोपदेखील राहुल गांधी यांनी केला.
महाआघाडीचे नेतृत्व कोणाकडे?2019 लोकसभा निवडणुकीत महाआघाडी होणं आवश्यक आहे, असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं. मात्र महाआघाडीचे नेतृत्व कोण करणार, याचे उत्तर देणं त्यांनी टाळलं.
(सत्याच्या लढ्यात विजय आपलाच - राहुल गांधी)
राहुल गांधी आज इफ्तार पार्टीचंही आयोजन करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राहुल गांधींची ही पहिलीच इफ्तार पार्टी आहे. या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपाविरोधी मोट बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना 2015मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मध्य प्रदेश, राजस्थानातून भाजपाचा सफाया अटळ - राहुल गांधी
दरम्यान, गुजरातमध्ये कसेबसे वाचले, कर्नाटकात हरले. आता मध्यप्रदेश व राजस्थानात तर भाजपाचा संपूर्ण सफाया होऊन विरोधकांची विजयी घौडदौड सुरू होईल, असा आत्मविश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात आम्ही लढलो. पण त्यांचा सन्मान आम्ही नेहमीच जपला, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.
मुंबई काँग्रेसतर्फे गोरेगावात झालेल्या बुथ कार्यकर्ता संमेलनात राहुल गांधी यांनी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, स्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवणारे पंतप्रधान मोदी प्रत्यक्षात १०-१५ बड्या उद्योगपतींचे चौकीदार आहेत. निरव मोदी, विजय मल्ल्या करोडो रुपये बुडवून पळाले, तेव्हा हे चौकीदार मूग गिळून बसून राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते की केवळ त्यांच्या भाषणावरच देश चालला आहे. खोटे बोलून तुम्हाला सत्ता मिळेलही, पण बेरोजगारांना रोजगार कसा मिळणार? शेतकऱ्यांच्या धान्याला भाव कसा मिळणार, असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.