Maharashtra Politics ( Marathi News ) मुंबई- देशात काही महिन्यांतच लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्वपक्षीयांनी निवडणुकांची तयारी सुरू केली असून भाजपविरोधात विरोदी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक दिल्लीत पार पडली. दरम्यान, आता इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार या चर्चा सुरू आहेत. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या नावांची यादी सांगितली.
" आमची लढाई हिटलरशाही विरोधात आहे, इंडिया आघाडीत पंतप्रधान पदासाठी एकापेक्षा अधिक चेहरे आहेत. भाजपकडे फक्त एकच चेहरा आहे. लोकांना पसंती असायला हवी. भाजपकडे १० वर्षापासून एकच चेहरा आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे हेही पंतप्रधान होऊ शकतात, आमच्याकडे पीएम पदासाठी अनेक चेहरे आहेत. यातील एका चेहरा पुढे येईल, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. इंडिया आघाडीकडे पीएम पदासाठी चेहरा नसल्याच्या आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'देवेंद्र फडणवीस डॉक्टरेटसाठी योग्य'
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधून डॉक्टरेट मिळाली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरेट मिळण्यास योग्य आहेत. सध्या डॉक्टरेट मिळण्याची स्पर्धा लागली आहे. उद्या हसन मुश्रीफ यांनाही डॉक्टरेट मिळेल. आम्हाला दिली तर आम्ही नाही म्हणेन आम्ही त्या लायक नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.