मुंबई : महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने बजावलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी १० दिवसांचा अवधी मागितला आहे. आयोगाने पाठविलेल्या नोटिसीतील तक्रार अर्ज मराठीत असून त्याचे इंग्रजी भाषांतर करून देण्याची मागणीही राहुल यांनी बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांना पाठविलेल्या पत्रातकेली आहे.जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणाचा निषेध करताना राहुल गांधी यांनी ट्विटरवर या मुलांचे फोटो, व्हिडीओ टाकले होते. पीडित मुलांची ओळख उघड केल्याबद्दल राहुल गांधी यांच्याविरोधात बाल हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत पीडित बालकांची ओळख जाहीर केल्याबद्दल आयोगाने राहुल गांधी यांनी नोटीस बजावली.पॉक्सो कायद्यानुसार संबंधित प्रकरणातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असताना पीडित बालकांची ओळख पटेल असा फोटो, व्हिडीओ प्रसारित करणे गुन्हा ठरतो. गांधी यांच्या ट्विटमुळे या गुन्ह्याचा भंग झाल्याने आयोगाने नोटीस पाठवली होती. मूळ तक्रारदाराचा अर्ज मराठीत असून तो इंग्रजीत उपलब्ध करून द्यावा तसेच उत्तरासाठी १० दिवसांचा अवधी देण्याची मागणी राहुल यांनी आयोगाकडे केली आहे. मात्र, आयोगाची नोटीस प्राप्त होण्यापूर्वी ती माध्यमात पोहोचल्याबद्दलही राहुल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांनी मागितला अवधी, बालहक्क आयोग नोटीस प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 1:00 AM