Join us

महाआघाडीचं नेतृत्त्व कोणाकडे देणार? राहुल गांधींनी दिली प्रश्नाला बगल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 1:08 PM

विरोधकांची एकजूट जनभावना असल्याचं राहुल गांधी म्हणाले

मुंबई : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. भाजपा आणि संघाला थोपवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र व्हावं, ही जनतेची भावना असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. पंतप्रधान मोदी आणि भाजपाकडून देशाच्या संविधानावर आणि संस्थेवर हल्ले होत असल्याचंही ते म्हणाले. 'भाजपाविरोधात एकत्र व्हावं, ही फक्त विरोधी पक्षांची इच्छा नाही. तर ही देशातील जनतेची इच्छा आहे. विरोधकांनी एकत्र येऊन भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदींचा मुकाबला करावा, अशी जनतेची भावना आहे,' असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी पत्रकारांनी राहुल यांना विरोधकांचं नेतृत्त्व कोण करणार, हा प्रश्न विचारण्यात आला. मात्र राहुल यांनी हा प्रश्न टाळला. पंतप्रधान मोदी आणि भाजपाकडून संविधानावर आणि संस्थांवर हल्ले केले जात असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. 'मोदींना आणि भाजपाला रोखायचं कसं, हा प्रश्न देशातील लोकांना पडला आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून विरोधी पक्षांना एकत्र आणायचे प्रयत्न सुरू आहेत,' असं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरावरुनही राहुल यांनी सरकारवर टीका केली. 'विरोधक पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी करत आहेत. मात्र सरकारला यात रस नाही,' असं राहुल गांधी म्हणाले. राहुल दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.  

टॅग्स :राहुल गांधीनरेंद्र मोदीकाँग्रेसभाजपा