Join us

जनाची नाहीतर मनाची असेल तर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 12:31 PM

राफेल विमान कराराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी अडचणीत आले होते.

मुंबई -  राफेल विमान कराराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी अडचणीत आले होते. दरम्यान, याबाबत राहुल गांधी यांनी दिलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्यानंतर आता भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी भाजपाने आज देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी जनाची नाहीतर मनाची  असेल तर देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राफेल विमान कराराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर भाजपाने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच चौकीदार चौर है म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राळ उडवणाऱ्या राहुल गांधी यांनाही न्यायालयाचा संदर्भ देऊन आरोप केल्याने सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर करावा लागला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजपाने आज देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. मुंबईत भाजपाच्या वसंत स्मृती येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच जनाची नाहीतर मनाची  असेल तर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.  गेल्या एप्रिलमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध टीकेची मोहीम सुरू केली होती. त्याच काळात राफेल विमाने खरेदी प्रकरणात मोदी सरकारला ‘क्लीन चिट’ देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या दिवशी राहुल गांधी यांना डेहराडूनमध्ये निकालाविषयी विचारले असता गांधी यांनी ‘अब सर्वोच्च न्यायालयने भी कहा है की चौकीदार चोर है’, असे वक्तव्य केले होते.

न्यायालयाने न वापरलेले शब्द तोंडी घातल्याबद्दल गांधी यांच्यावर न्यायालयीन अवमाननेची कारवाई करावी, असा अर्ज भाजपच्या खा. मीनाक्षी लेखी यांनी केला. न्यायालयाने याबद्दल जाब विचारल्यावर राहुल गांधी यांनी सुरुवातीस कृतीचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र केले. मात्र, दुसऱ्या प्रतिज्ञापत्राद्वारे चूककबूल करून, बिनशर्त माफी मागितली. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने गांधी यांना वरील समज देऊन अवमानना कारवाई आटोपती घेतली होती. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलराहुल गांधीराफेल डीलभाजपा