Join us

"राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, उद्धव ठाकरेंकडून अपेक्षाभंग"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 4:47 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई  - काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा बनली आहे. कारण, राहुल गांधींनी हिंगोलीतील एका सभेत स्वा. सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर, भाजप नेते आणि शिंदे गटातील नेते आक्रमक झाले असून राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. तसेच, उद्धव ठाकरेंवरही त्यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत असून राहुल गांधींविरुद्ध आंदोलनाही करण्यात येत आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. 'राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. मात्र, राहुल गांधींच्या विधानानंतर शिंदे गटासह भाजप नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला. तसेच, राहुल गांधींसोबत गळाभेट केल्यावरुनही टीका केली, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राहुल गांधींवर टीका केली. तर, उद्धव ठाकरेंकडून अशी अपेक्षा नाही, असे म्हटले. 

जेव्हा राजीव गांधी यांची जयंती आणि पुण्यतिथी असते तेव्हा उद्धवजी त्यांना आदरांजली देतात. राहुल गांधींनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच पुजन केलं. पण, चार शब्द आदराचे त्यांच्या बोलण्यात आले नाहीत. तसे कुठेही दिसून आले नाही. उध्दव ठाकरे हे काँग्रेस पक्षाला समर्पित झालेले आहेत. वीर सावरकरांबद्दल राहुल गांधींनी आक्षेपार्ह विधान केले. तेव्हा, उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेचा बहिष्कार करतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, बहिष्कार केला नाही. याउलट आदित्य ठाकरे यांना भारत जोडो यात्रेत पाठवतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, राहुल गांधी यांनी देशाची माफी मांगायला पाहीजे, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :राहुल गांधीचंद्रशेखर बावनकुळेभाजपाउद्धव ठाकरे