मुंबई-
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचं काहीच कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सावरकरांबाबतच्या राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे मविआमध्ये धुसफूस असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात संजय राऊत यांनीही सूचक विधान करत काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.
संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. "महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांवर अशाप्रकारचे आरोप करणं आणि त्यांची बदनामी करणं हे महाराष्ट्राला अजिबात मंजूर नाही. शिवसेना काय तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही याचं समर्थन करणार नाहीत. राहुल गांधींनी असं वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. भारत जोडो यात्रा देशातील हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी या महत्वाच्या प्रश्नांच्या विरोधात निघाली आहे. यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मग अशावेळी वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
इतिहासात काय घडलं ते चघळत बसू नका"वीर सावरकरांबाबत आम्हाला अभिमान आहे. इतिहासात काय घडलं आणि काय नाही घडलं ते चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधी यांनी त्याकडे लक्ष द्यावं. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमची सातत्यानं मागणी आहे. पण मला कळत नाही हे जे नवे भाजपावाले नवे सावरकर भक्त निर्माण झालेत ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का उचलून धरत नाहीत. वीर सावरकर हे भाजपाचे आणि संघाचे कधीच श्रद्धास्थान नव्हते, हे इतिहास सांगतो. पण आता राजकारणासाठी भाजपानं सावरकरांचा विषय घेतलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच वीर सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार केलेला आहे", असं संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"