मुंबई : यूपीएच नाही तर, एनडीएची आघाडीही देशात अस्तिवात नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटून मी सांगितले आहे की, यूपीएला आपण ताकद दिली पाहिजे. यूपीएमध्ये नवे मित्र आणले पाहिजेत. आता त्या दृष्टीने राहुल गांधी पावले टाकताना मला दिसत आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी लोकमत DIA (डिजिटल इन्फ्लुएन्सर ॲवॉर्ड) पुरस्कार सोहळ्यात केला.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीए आता आहेच कुठे, असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, राहुल गांधी यूपीएसाठी प्रयत्न करत आहेत, असे सांगून त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या विधानातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता आम्ही यूपीएमध्ये नाही. अकाली दल आणि शिवसेनाही एनडीएत नाही. असे अनेक पक्ष आहेत जे कोणत्याही आघाडीत नाहीत. अशा पक्षांना समर्थ पर्याय उभा राहिला पाहिजे, असे वाटते. हळूहळू त्या दिशेने काही तरी घडताना दिसत आहे, असे सूचक वक्तव्यही राऊत यांनी केले.
ममता बॅनर्जी यांच्याशी मुख्यमंत्री उद्द्धव ठाकरे यांचे फोनवर बोलणे करून दिले. माझ्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते. आदित्य यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी काही संदेश दिले होते. ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविले, असे ते म्हणाले. मुलीच्या लग्नातल्या नृत्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला, त्यावर राऊत म्हणाले, आम्ही ठरवून नाचतो, त्याच्या स्टेप्स आणि स्टेजही आम्हीच ठरवतो. एकदा ठरविले की झाले. सरकार बनवणे हाही एका नृत्याचाच प्रकार होता, असे राऊत म्हणताच प्रचंड हंशा पिकला. कोलकाताच काल महाराष्ट्रात आला होता. बंगालची वाघीण महाराष्ट्रात होती आणि महाराष्ट्र हा वाघांचा प्रदेश आहे, अशी टिप्पणीही राऊत यांनी केली.
लोकमतकडे मनाचा मोठेपणा : लोकमतच्या ऋषी दर्डा यांचे मला विशेष कौतुक आहे. त्यांनी सुरू केलेला लोकमत DIA पुरस्कार इंटरेस्टिंग आहे. यानिमित्ताने त्यांनी तरुण पिढीशी उत्तम नाते जोडले आहे. मला लोकमतने पुरस्कार दिला. एक वर्तमानपत्र दुसऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकाला पुरस्कार देत नाही. त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. तो मोठेपणा दर्डा आणि लोकमत परिवाराकडे आहे, असे गौरवोद्गारही राऊत यांनी काढले. लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा आणि एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या आजवरच्या मेहनतीचा आणि मराठीपणाचाही राऊत यांनी गौरव केला.