मुंबई - मध्य प्रदेशमध्ये राजकीय भुकंप पाहायला मिळाला आहे. काँग्रेस सरकारमधील 22 आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिले. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने 19 आमदारांचे राजीनामे मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. या घडामोडी घडत असताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आता, राहुल गांधींच्या या टीकेला महाराष्ट्र भाजापाने प्रत्युत्तर दिलंय.
पीएमओला उद्देशून राहुल यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात मोदीजी तुम्ही पेट्रोल-डिजेलच्या दरात जागतीक पातळीवर 35 टक्क्यांनी झालेली घसरण विसरून गेले आहात. आंतरराष्ट्रीय बाजारातील या दरकपातीचा फायदा भारतीयांना व्हावा. भारतात पेट्रोल-डिजेलचे दर 60 रुपयांपेक्षा कमी करून द्याल का?, असा सवाल राहुल यांनी मोदी सरकारला केला आहे. तसेच इंधनाचे दर कोसळल्याने देशातील अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असंही राहुल यांनी म्हटले होते. राहुल यांच्या ट्विटला महाराष्ट्र भाजपाने जशास तसेच उत्तर दिलंय.
राहुल गांधीजी परत आलात, तुमचं स्वागत... आशा आहे की, सुट्टी चांगली गेली असेल. आता, तुम्ही परदेश दौऱ्यावर असताना, महाराष्ट्रातील तुमच्या आघाडी सरकारने 1 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढीचा निर्णय घेतला आहे. जसं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत काँग्रेससोबत चर्चाही केली नाही, असे म्हणत राहुल गांधींच्या पेट्रोलवरील दरकपातीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र भाजपाने जशास तसे उत्तर दिलंय. तर, महाविकासा आघाडी सरकारने 1 रुपयांची केलेली दरवाढही राहुल गांधींना लक्षात आणून दिलीय.
दरम्यान, काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. शिंदे यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामे दिल्यानं राज्यातलं काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात जोरदार सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र, मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या एका दाव्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे जगभरात थैमान घालत असलेल्या कोराना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिजेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या घडामोडींचा धागा पकडून राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.