Join us  

राहुल गांधींची मुंबईत सभा होणार की नाही; हायकोर्टात केलेली याचिका काँग्रेसने घेतली मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 2:53 PM

Rahul Gandhi's Rally in Mumbai : प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने काँग्रेसने राहुल गांधींच्या सभेसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आता काँग्रेसकडून ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवर एक रॅली आयोजित करण्यात आली होती. २८ डिसेंबर हा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवसाला काँग्रेससाठी विशेष महत्व असणार आहे. मुंबई काँग्रेसने या दिवशी शिवाजी पार्क येथे सभा घेता यावी म्हणून मुंबई महापालिकेला पत्र पाठवलं. मात्र, महापालिकेने नगरविकास विभागाकडे जाण्यास सांगितले. नंतर प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने काँग्रेसने राहुल गांधींच्या सभेसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आता काँग्रेसकडून ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

हायकोर्टात सुनावणी होण्यापूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी बिनशर्त याचिका मागे घेतली आहे. मात्र, राज्य सरकारने परवानगी दिली की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दरम्यान आज दुपारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा २८ डिसेंबरला शिवाजी पार्कवर आयोजित करण्याची तयारी मुंबईकाँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस करत असताना राज्य सरकारने अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे परवानगीसाठी काँग्रेसने हायकोर्टात याचिका केली होती. 

या सभेच्या निमित्ताने राहुल गांधी हे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या राजवटीवरही ते शाब्दिक हल्ले करतील. राजस्थानमधील रॅलीनंतर मुंबईची सभा यशस्वी करण्याची तयारी पक्षाकडून केली जात आहे. 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना विचारले असता, त्यांनी २८ डिसेंबरच्या शिवाजी पार्कवरील सभेसाठी मुंबई महापालिका व राज्य सरकारकडे आवश्यक परवानग्या मागितलेल्या आहेत, मात्र अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :राहुल गांधीउच्च न्यायालयकाँग्रेसअशोक जगताप