काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मंगळवारी दिली. सभा रद्द झाली नसून, ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेत पुढे ढकलल्याचे कारण जगताप यांनी दिले. तर, सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात दाखल याचिका अवघ्या २४ तासांत बिनशर्त मागे घेण्यात आली.ओमायक्रॉनचा धोका वाढत असून, रोज रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईकरांची आम्हाला काळजी आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते आणि राज्य सरकारसोबत चर्चा करून सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे स्थिती अनुकूल होताच ही सभा घेतली जाईल, असे जगताप यांनी सांगितले. ही सभा रद्द झाली असली, तरी मुंबईतील ज्या तेजपाल हॉलमध्ये काँग्रेसची स्थापना झाली तिथेच नियम पाळून स्थापना दिनाचा कार्यक्रम घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसकडून केलेली याचिका मागेकाँग्रेस पक्षाच्या शिवाजी पार्क येथे २८ डिसेंबरला होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वी काँग्रेसने याचिका मागे घेतली. याचिका मागे का घेण्यात आली? यामागचे कारण त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले नाही. काँग्रेसच्यावतीने भाई जगताप यांनी सोमवारी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी न्या. अमजद सय्यद व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती. मात्र, सकाळच्या सत्रात जगताप यांच्यावतीने ज्येष्ठ वकील व्ही. ए. थोरात यांनी आपण ही याचिका बिनशर्त मागे घेत असल्याचे खंडपीठाला सांगितले