मुंबई - कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सातत्यानं केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. मंगळवारी त्यांनी कोरोना काळातील सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, सरकारने फेब्रुवारीमध्ये नमस्ते ट्रम्पचं आयोजन केलं आणि मार्चमध्ये मध्य प्रदेशात सरकार पाडले, जुलैमध्ये राजस्थान सरकार खाली आणण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. म्हणूनच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हा देश आत्मनिर्भर आहे. राहुल गांधींच्या या टिकेला भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.
प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राहुल गांधींची गेल्या सहा महिन्यातील कमाई म्हणजे उपलब्धता काय आहे, हे सांगितलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत, गेल्या 6 महिन्यात मोदी सरकारने केलेल्या कामाचा आलेख आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन घोषित केला. राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.
फेब्रुवारी - शाहीन बाग व दंगल, मार्च- मध्य प्रदेश आणि ज्योतिर्रादित्य शिंदेंना गमावले, एप्रिल - स्थलांतरीत मजुरांना भडकावणे, मे - काँग्रेसच्या ऐतिहासिक पराभवाची 6 वी वर्षपूर्ती, जून - चीनचं समर्थन करणे आणि जुलै - राजस्थानमध्ये काँग्रेसचं खच्चीकरण... ही राहुल गांधींची गेल्या 6 महिन्यातील उपलब्धता आहे, असे प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
दरम्यान, राहुल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'कोरोना कालावधीत सरकारची कामगिरी: फेब्रुवारी-नमस्ते ट्रम्प, मार्च- मध्य प्रदेशात सरकार पाडलं, मे- मेणबत्ती जाळली, मे- सरकारचा 6वा वर्धापन दिन साजरा, जून- बिहारमध्ये आभासी मेळावा आणि जुलै-राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कोरोनाच्या युद्धात देश 'आत्मनिर्भर' आहे. ' त्याआधी रविवारी राहुल गांधी म्हणाले होते की, कोरोना विषाणूची लागण आणि त्यामुळे होणा-या मृत्यूच्या आकडेवारीबाबत भाजपा सरकार खोटे बोलत आहे. सरकार जीडीपी आणि चिनी आक्रमणांबद्दलही खोटी माहिती देत आहे. राष्ट्रीय स्तरावरील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर केंद्र सरकार खोटे बोलत आहे. ते म्हणाले की, सरकार राष्ट्रीय महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांवर खोटे बोलत आहे आणि लवकरच भाजपकडून पसरलेला गोंधळ दूर होईल. त्यांनी ट्वीट करून म्हटले होते की, 'भाजपाने खोटेपणाला संस्थागत स्थान दिले आहे.