Join us

काँग्रेसचे शिष्टमंडळ घेणार राहुल गांधींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:18 AM

नाणार प्रकल्पाबाबत सरकारमधील लोकांची परस्पर विरोधी विधाने पाहता सरड्यानाही लाज वाटेल.

मुंबई : नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत २८ एप्रिल रोजी काँग्रेसचे शिष्टमंडळ पक्षाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची भेट घेणार असून या शिष्टमंडळात प्रकल्पग्रस्तांचा समावेश असेल, असे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.नाणार प्रकल्पाबाबत सरकारमधील लोकांची परस्पर विरोधी विधाने पाहता सरड्यानाही लाज वाटेल. भाजप शिवसेनेची मॅच फिक्सिंग आहे. दोन्ही पक्ष जनतेच्या भावनांशी खेळत असून सरकाचे आतून किर्तन बाहेर तमाशा सुरु आहे,अशी टीकाही खा. चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली.खा. चव्हाण म्हणाले, नाणार गावचा औद्योगिक क्षेत्रात समावेश करणारी अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी परस्पर करून टाकली तर मुख्यमंत्री म्हणतात अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उच्चाधिकार समितीला आहे. सेनेच्या कॅबिनेट मंत्र्याला मुख्यमंत्री कवडीचीही किंमत देत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे देसाई यांनी तात्काळ राजीनामा देऊन शिवसेनेने सत्तेबाहेर पडले पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.पेट्रोल, डिझेलवर लावलेला अन्यायकारक कर कमी करून इंधनावर लावलेले विविध अधिभार रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली असल्याची माहिती खा. चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :काँग्रेस