मनीषा म्हात्रेमुंबई : टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या राहुल नंदा यांनी एमएमआरडीएच्या सुरक्षारक्षकाच्या घोटाळ्याबरोबरच निव्वळ कागदोपत्री मालमत्ता वाढवून मालमत्तेच्या चौपट पैसे परदेशात गुंतवले. यातूनच लंडनमध्ये घर घेऊन तेथील द शील्ड गार्डिंगमध्ये ५१ टक्के समभाग घेतल्याचा आरोप टॉप्स ग्रुपच्या तक्रारदार अधिकाऱ्यांनी केला.
टॉप्स ग्रुपचे रमेश अय्यर यांच्या तक्रारीनुसार, २००८ मध्ये टॉप्स कंपनीने लंडनच्या द शील्ड गार्डिंग कंपनीत १३० कोटी रुपयांचे ५१ टक्के समभाग घेतल्याचे समोर आले. २०१२ पासून ही कंपनी नंदाच सांभाळत होते. कागदोपत्री मालमत्ता वाढवून पैसे परदेशात पाठवले, आयसीआयसीआय बँक व्हेन्चर लिमिटेड, एव्हरस्टोन कॅपिटल यांना माहिती असूनही त्यांनी यात गुंतवणूक केली. पुढे द शील्ड कंपनी बेकायदेशीर व्यवहारामुळे लिक्विडेशनमध्ये गेली. त्यामुळे टॉप्स कंपनीने गुंतविलेल्या रकमेचे नुकसान झाले. भारतातील पैसा लंडनच्या कंपनीत गुंतवून त्यामधून कर्जाद्वारे मालमत्ता संपादन केली. आयकर विभागाला अंधारात ठेवले.
पुढे नंदा यांनी चिप केअर एलएलपी नावाने नवीन व्यवसाय सुरू केला. २०१७ ते २०१९ दरम्यान तब्बल २५ कोटी रुपये टॉप्स ग्रुप कंपनीतून चिप कंपनीत पाठविले. ही रक्कम कंपनीला कर्ज म्हणून दाखवली. याबाबत संचालक आणि शेअरधारकांनाही अंधारात ठेवले. त्यानंतर चिप कंपनीचा तोटा दाखवून कंपनी बंद केली. टॉप्स ग्रुपला पैसे परत दिले नाहीत, असेही तक्रारीत नमूद आहे.
आराेप फेटाळलेn २०१७ मध्ये नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी टॉप्स कंपनीत त्यांचे ६६ टक्के समभाग मॉरिशस येथील नंदा फॅमिली नावाच्या ट्रस्टमध्ये ट्रान्सफर केले.n ईडीने नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध फेमा कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली. त्यानंतर कंपनीचे संचालक नसतानाही २०१६ पासून त्यांनी ८ कोटी रुपये कंपनीतून घेतले, असा आराेप आहे. ईडी या प्रकरणी अधिक चौकशी करीत असून नंदा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले.
....म्हणून माजी पोलीस महासंचालकांनीही दिला राजीनामाटॉप्स ग्रुप गैरव्यवहार
मुंबई : टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांनी कंपनी कर्जबाजारी होत असताना, शेअर्स होल्डरचा विश्वास संपादन करण्यासाठी माजी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्यासह चार दिग्गज मंडळीवर संचालक पदाची जबाबदारी साेपविली हाेती. मात्र सरकारी थकबाकीचे पत्र त्यांच्याकडे येताच त्यांनी तत्काळ राजीनामे दिल्याचे दाखल गुन्ह्यांत नमूद आहे.
टॉप्स ग्रुपचे रमेश अय्यर यांनी कलेल्या तक्रारीनुसार, परदेशातील गुंतवणुकीबरोबर नंदा यांनी जुलैमध्ये संकेतस्थळावरून स्वतःसह कुटुंबीयांची नावे हटविली. अय्यर, अमर पनघल यांच्यासह अन्य संचालकांची नावे त्यावर टाकली. यात माथुर यांच्यासह आयएएस दिनेशकुमार गोयल यांची नेमणूक केली. मात्र थकबाकीचे पत्र आल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले. कंपनीच्या गैरव्यवहाराबाबत नंदा यांच्याकडे विचारणा करताच त्यांनी २५ एप्रिल रोजी अधिकृत ईमेल ब्लॉक केले. त्यांचे ईमेल हॅक करून त्याद्वारे मेल केल्याचाही आरोप आहे. राजकीय संबंधामुळे ते कारवाईपासून वाचत असल्याचा आरोपही अय्यर यांनी केला आहे.