मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स आणि मलबार हिल जलाशय या दोन कळीच्या मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद साधल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी दक्षिण मुंबईतील संवेदनशील अशा भाडेकरूंच्या मुद्द्याला हात घातला आहे. पागडी टेनन्ट ॲक्शन कमिटीतर्फे मंगळवारी मरिन लाइन्स येथे झालेल्या खुल्या चर्चासत्रात त्यांनी हजेरी लावल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
दक्षिण मुंबई हा प्रतिष्ठेचा लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला जाणार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना लढणार की, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जाणार, याचे चित्र पुरेसे स्पष्ट झालेले नाही. पागडीच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी या रहिवाशांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही देऊन टाकले.
दक्षिण मुंबईचा राजकीय तिढा कसाही सुटो; पण, भाजपने मात्र आपली तयारी सुरू केल्याचेच यातून दिसून येत आहे. चर्चासत्रात नार्वेकर म्हणाले की, आपल्याकडे लोकशाही आहे. पागडी सिस्टीममध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळेल, यासाठी आम्ही काम करीत आहोत. १५० वर्षांपासून पागडी सिस्टीम येथे आहे. हा मुंबईचा इतिहास आहे, गौरव आहे. एका व्यक्तीपुरता हा विषय नाही. कोणाची फसवणूक होणार नाही किंवा कोणावरही अन्याय होणार नाही.
पागडी टेनन्ट असोसिएशन आणि मुंबई शहर तसेच उपनगरातील बहुतांशी रहिवाशांनी या चर्चासत्राला हजेरी लावली होती. सरकारी यंत्रणा किंवा बिल्डर यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास होत नाही. अशा अनेक मुद्द्यांकडे उपस्थितांनी राहुल नार्वेकर यांचे लक्ष वेधले.
भाजपने आपली पावले नियोजनपूर्वक टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल नार्वेकर यांनी जनसंवाद मोहीम सुरू ठेवली आहे. मलबार हिल जलाशय, महालक्ष्मी रेसकोर्स याबाबत स्थानिक नागरिकांची बैठक गेल्याच आठवड्यात घेतल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा भाडेकरूंच्या प्रश्नाकडे वळविला.