मुंबई- गेल्या काही दिवसापासून शिवसेनेतील १६ आमदार अपात्रतेवरुन चर्चा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली. यात दोन्ही बाजूकडून युक्तिवाद झाला. विधानसभा अध्यक्षांनी पुढची तारीख दिली आहे. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेवर कोणतीही कारवाई केलेली नाही यावरुन आज सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांच्या कामकाजावर ताशेरे ओढल्याचे बोलले जात आहे, यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रीया दिली.
"आठवडाभरात सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सुनावलं"; शिवसेनेनं सांगितलं
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं, याची माहिती माझ्यापर्यंत अजून आलेली नाही. सुप्रीम कोर्टात झालेल्या ऑर्डर संदर्भात माहिती मी घेईन. त्यानंतर पुढच्या कारवाई बाबत निर्णय घेईन. ज्यावेळेस माझ्याकडे निर्णयाची प्रत येईल त्यावेळी मी उत्तर देईल. कोणाच्या मागणीवर निर्णय नाही घेऊ शकत. कायद्याने आणि नियमाने निर्णय होईल, कोणतीही घाई मी करणार नाही.कायदेशीर बाबी बघून निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट नार्वेकर यांनी सांगितले.
आमदार अपात्रतेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभू यांनीही प्रतिक्रीया दिली. प्रभू म्हणाले, मागील तीन तास कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. अजय चौधरी, मी आणि वकीलांनी सर्व कागदपत्र पडताळली. यात ज्या गोष्टी आढळल्या त्या योग्यवेळी पुढच्या सुनावणी वेळी मांडू. आज सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जे निर्देश दिले आहेत ते त्यांना पाळावे लागतील. नियमानुसार न्याय आम्हालाच मिळावा हीच आमची मागणी आहे, असंही प्रभू म्हणाले.
"आठवडाभरात सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सुनावलं"
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत अद्यापही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये विविध याचिकांची भर पडल्याचेही पाहायला मिळाले. शिवसेनेतून फुटून निघालेल्या १६ आमदारांची अपात्रता याचिका, शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. आता, विधानसभा अध्यक्षांकडे असलेल्या सुनावणीवर न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यानुसार, लवकरात लवकर हे अपात्रतेचं प्रकरण निकाली लावा, असे न्यायालयाने म्हटल्याचे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर सध्या सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांनी रिझनेबल वेळेत याचिका निकाली काढली नसल्याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर, आज झालेल्या सुनावणीबाबत अनिल देसाई यांनी माहिती दिली.