कोळंबकर प्रचारात सहभागी होणारच- राहुल शेवाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 01:32 AM2019-04-20T01:32:09+5:302019-04-20T01:32:30+5:30

काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी युतीला पाठिंबाही जाहीर केला आहे.

Rahul Shewale will be participating in the campaign | कोळंबकर प्रचारात सहभागी होणारच- राहुल शेवाळे

कोळंबकर प्रचारात सहभागी होणारच- राहुल शेवाळे

Next

मुंबई : काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी युतीला पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यांच्याविरोधात स्थानिक शिवसेना नेत्यांमध्ये काही नाराजी असली तरी लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावाच लागेल, असे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. शिवाय, कोळंबकर आजपासून प्रचारात सहभागी होणार असल्याचेही सांगितले.
शिवाजी पार्क येथील ओपन जिममध्ये हनुमान जयंतीनिमित्त शेवाळे यांनी पूजा केली. यानंतर काही व्यायाम प्रकारही केले. हनुमान शक्तीचे प्रतीक आहे. स्वत:साठी बलोपासना आणि सुदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या वेळी कोळंबकर यांच्या पाठिंब्यावरून निर्माण झालेल्या वादंगाबाबत शेवाळे म्हणाले की, कोळंबकर यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीला फायदाच होणार आहे. त्यांना प्रदीर्घ राजकीय वर्ग असून त्यांना मानणारा वर्गही आहे. स्थानिक पातळीवर काही प्रश्न असतील तर त्याचा नक्की विचार केला जाईल. नाराजी असली तरी ती दूर करण्याचा प्रयत्न करू, असे शेवाळे म्हणाले.
कोळंबकर यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज वडाळा, नायगाव भागात ते प्रचारही करत आहेत. एक-दोन दिवसांत तेथे माझ्या प्रचारफेऱ्या असून त्यात कोळंबकर सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवाळे यांनी वडाळा विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना कोळंबकर यांची भेट घेतली होती़ यावर काही शिवसैनिकांनी आक्षेप घेतला़ कोळंबकर यांनी आधी काँग्रेसचा राजीनामा द्यावा मगच युतीचा प्रचार करावा, अशी मागणी काही शिवसैनिकांनी केली होती़ त्यावर अनेक तर्कवितर्क लढवले गेले़ मात्र शेवाळे यांनी भूमिका स्पष्ट केल्याने वादावर पडदा पडला आहे़
>देशहित, पक्षहित लक्षात घेऊन काम करा
देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ नेतृत्वाने युतीचा निर्णय घेतल्यानंतर त्यानुसार आपण सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. पक्षशिस्त जपायलाच हवी. काही मनभेद अथवा मतभेद असतील तर ते विसरून काम करावे लागेल. कोळंबकरांनीही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला. देशाची निवडणूक आहे. त्यासाठी देशहित आणि पक्षहित लक्षात घेत सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. पक्ष आहे म्हणून आपण आहोत, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे, असेही शेवाळे यांनी सुनावले.

Web Title: Rahul Shewale will be participating in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.