औरंगाबाद - औरंगाबाद शहरात आज पहाटे आयकर विभागाने चार ठिकाणी धाडी टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्योतीनगर येथील एका बड्या व्यापाऱ्याच्या घरावर पुणे येथील आयकर विभागाचे पथक पहाटेच धडकले. येथे अधिकाऱ्यांनी झाडाझडती सुरू केली दरम्यान, हा व्यापारी शहरातील बड्या शिवसेना नेत्याचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. त्यानंतर, शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांनी सरकावर निशाणा साधला आहे. धाडी टाकून घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही, असे दानवे यांनी म्हटले. तसेच, दसरा मेळाव्यासंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
आमच्यावर दबाव निर्माण करण्यासाठीच आयकर विभागाचे संभाजीनगरमध्ये शिवसेनेशी संबंधितांवर छापे सत्र सुरु आहे. मात्र आम्ही याला घाबरणार नाही, असे म्हणत दानवे यांनी आयटीच्या धाडीवरुन सरकावर निशाणा साधला. तसेच, दसरा मेळाव्याबाबतही स्पष्टपणे भूमिका मांडली. मागच्या 56 वर्षांपासून शिवसेना शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेत आहे. यंदाही त्याच ठिकाणी दसरा मेळावा होणार असल्याचा विश्वास दानवेंनी व्यक्त केला, जालन्यात पत्रकारांशी ते बोलत होते.
शिवाजी पार्क मैदान फ्रीज होणार?
शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्यापासून कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आखली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्या अंतर्गत शिवाजी पार्क ‘फ्रीज’ केले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीचा अर्ज महापालिकेकडे केला आहे. त्यावर महापालिकेने निर्णय घेतलेला नाही. शिवाजी पार्कवरून राजकीय वाद नको, अशी भूमिका घेत महापालिकेने उद्या या दोघांनाही परवानगी नाकारली तर बीकेसीतील मैदानाचा पर्याय शिंदे गटाने खुला ठेवला आहे.
पाच दशकांचे नाते तोडण्याची रणनीती -
महापालिकेने दोघांनाही परवानगी नाकारून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ‘फ्रीज’ केले तरी शिंदे गटाला राजकीय यशच मिळेल. कारण, त्या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊ शकणार नाहीत आणि ठाकरे आणि शिवाजी पार्कचा दसरा मेळावा हे पाच दशकांहून अधिक काळापासूनचे नाते तोडता येईल. शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदारांनी बंड केले. अनेक जिल्ह्यांमध्येही शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेला ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होऊ द्यायचा नाही, अशी रणनीती शिंदे गटाने आखली आहे.