बँक बुडविणाऱ्या कंपनीच्या मुंबई, इंदोरमधील कार्यालयांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:30+5:302021-06-17T04:06:30+5:30
१८८ कोटींचा घोटाळा; सहा ठिकाणी झडती, सीबीआयची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बँकांकडून कोट्यवधीचे कर्ज बुडविणाऱ्या ...
१८८ कोटींचा घोटाळा; सहा ठिकाणी झडती, सीबीआयची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँकांकडून कोट्यवधीचे कर्ज बुडविणाऱ्या एका खासगी कंपनी व त्यांच्या संचालकांच्या मालमत्तेवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) मोर्चा वळविला आहे. मुंबई, इंदोर व बंगलोर येथील त्यांच्या सहा ठिकाणांवर बुधवारी छापे टाकण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
पीएनबी, जम्मू अँड काश्मीर आणि बँक ऑफ बडोदा या बँकांची १८८ कोटी ३५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी रुची ग्लोबल लिमिटेड कंपनी आणि त्याचे संचालक, उमेश सहारा, संकेत बरोडिया, आशुतोष मिश्रा व अन्य सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत गैरव्यवहार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
रुची ग्लोबल लिमिटेड कंपनीने बँक ऑफ बडोदा आणि पीएनबी व जे अँड के बँकेच्या माध्यमातून बनावट कंपनीच्या नावे कर्ज उचलून १८८ कोटी ३५ लाखांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँक ऑफ बडोदाने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या कंपनीच्या मुख्य कार्यालयासह इंदोर येथील काॅर्पोरेट कार्यालय व अन्य ठिकाणी छापे टाकण्यात आले. तेथून महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे.
.........................................................