वाशीत व्हिडीओ गेम पार्लरवर छापे
By admin | Published: April 29, 2015 11:57 PM2015-04-29T23:57:48+5:302015-04-29T23:57:48+5:30
वाशी येथे विनापरवाना चालणाऱ्या तीन व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये रोख रक्कम तसेच साहित्य असा १८ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
नवी मुंबई : वाशी येथे विनापरवाना चालणाऱ्या तीन व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये रोख रक्कम तसेच साहित्य असा १८ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी २६ जणांना अटक करून त्यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधुसूदन परिदा (४०), के. एल. मनुसुखाने (६५) व अबीद मन्सुरी (४३) यांच्यामार्फत ते पार्लर चालवले जायचे.
परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. वाशी सेक्टर - २ येथे विनापरवाना व्हिडीओ गेम पार्लर चालत असल्याची माहिती त्यांना मिळाली. व्हिडीओ गेमच्या माध्यमातून तिथे जुगार खेळला जायचा. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रोहन बागडे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी तिन्ही ठिकाणी छापे टाकले.
यावेळी तिथे जुगार खेळणाऱ्या २६ जुगारींना अटक करण्यात आली. त्यामध्ये एका गेम पार्लर चालकाचाही समावेश आहे. सुपरस्टार व्हिडीओ गेम, साई कृपा व्हिडीओ गेम व वेलकम व्हिडीओ गेम अशी कारवाई झालेल्या गेम पार्लरची नावे आहेत.
वाशी सेक्टर-२ व मेघराज चित्रपट गृहालगतच्या परिसरात हे गेम पार्लर सुरू होते. या ठिकाणांवरून पोलिसांनी एकूण २ लाख १७ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. त्याशिवाय ३८ व्हिडीओ गेम व ४० संगणक असा १५ लाख रुपये किमतीचा मालही ताब्यात घेतला आहे. (प्रतिनिधी)