Join us  

‘रायगड विकास’चा शुभारंभ ११ एप्रिलला

By admin | Published: March 31, 2017 4:10 AM

रायगड विकासाच्या ५६३ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ एप्रिलला

मुंबई : रायगड विकासाच्या ५६३ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमास राज्यातील जवळपास वीस हजार शिवप्रेमी येणार असून, शाहीरी पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. राज्यातून आणलेल्या विविध नद्यांच्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस विभागातर्फे एकवीस फैरींची सलामी देण्यात येणार आहे, तसेच मराठा बटालियनचे बॅन्डपथक असणार आहे. गडावर भव्य पालखी सोहळा होणार असून जवळपास एक हजार ढोलताशांचा गजर होणार आहे. संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाचा सत्कार करण्यात येणार आहे. या समारंभाला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आदी प्रमुख पाहुणे असतील. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ तसेच येथील स्थानिक उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी सोहळ्यानिमित्त येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)विकासासाठी अनुदानमहाडच्या चवदार तळे परिसर विकास आणि सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डिसेंबरपूर्वी अनुदान दिले जाईल, असे गृहनिर्माण मंत्री रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी मंंत्रालयातील बैठकीत सांगितले. या सोयींबाबत कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत ही बैठक मंत्रालयात झाली. चवदार तळ्याच्या संपूर्ण विकासासाठी व अनुयायांना सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन निधी, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेतूनही निधी दिला जाईल, असे मेहता यांनी सांगितले.